आंध्र प्रदेशमधील तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला जाणाऱ्या एका व्यक्तीला गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने अडवण्यात आल्याचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. एका व्यक्तीने फेसबुकला शेअर केलेल्या व्हिडीओत महाराजांची मूर्ती असल्याने चेकपोस्टवरुन पुढे जाऊ दिलं नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान विधानसक्षा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून निषेध व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय आहे व्हिडीओत –

सुरेश पाटील नावाच्या व्यक्तीने २२ जून रोजी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी “मी आज तिरुपतीहून तिरुमाला येथे जात होतो. मात्र चेकपोस्टवर माझी कार चेक करण्यात आली. यावेळी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कारमधून काढण्यास सांगितलं. नाही काढली तर तुम्ही कार वरती नेऊ शकत नाही, असं मला तेथील अधिकाऱ्याने सांगितले. मी त्यांना विनंती केली पण त्यांनी नकार दिला,” असा दावा सुरेश पाटील या व्यक्तीने केला होता.

“छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत, अवमान सहन करणार नाही.” ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद पाटलांचा इशारा

अजित पवारांकडून निषेध –

“तिरुपती देवस्थानासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणाऱ्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला. मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळात आहेत. मी त्यांच्याशी संपर्क साधला. ते त्याबद्दल निवेदन देणार आहेत. कारण नसताना जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत असून त्यांच्याबद्दल अशा पद्धतीच्या बातम्या पसरणं, चर्चा होणं किंवा सोशल मीडियात बातम्या येणं चुकीचं आहे. त्यामुळे त्यांना निवेदन देण्यास सांगितलं आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

“अनेक लोक आम्हालाही फोन करुन नेमकं काय झालं आहे याबद्दल विचारणा करत आहेत. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून असं काही घडलं आहे का? तसंच त्यांची काय भूमिका आहे? याबद्दल चर्चा केली पाहिजे. वस्तुस्थिती लोकांसमोर आली पाहिजे,” अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिरुपती संस्थानकडून स्पष्टीकरण

भाविकांना त्यांच्या वाहनांमध्ये मूर्ती, छायाचित्रं, राजकीय पक्षाचे ध्वज आणि चिन्हं, मूर्तिपूजक प्रचार साहित्य तिरुमालाला नेण्यास मनाई असल्याचं स्पष्टीकरण तिरुमाला तिरुपती संस्थानकडून देण्यात आलं आहे. नियमाप्रमाणे आम्ही संबंधित व्यक्तीला अडवलं असता त्यांनी आमच्यावर शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत व्हिडिओ बनवला असं संस्थानचं म्हणणं आहे.