सांगली : इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना त्यामध्ये उरुणचा समावेश निश्चितपणे शासनाकडून केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे. मात्र, नावात बदल करत असताना उरुण असा उल्लेख करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची श्री. पाटील यांनी भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. तसेच या वेळी त्यांनी ईश्वरपूरच्या नावात उरणचा समावेश करावा अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेने उरुण ईश्वरपूर असा प्रस्ताव दिला आहे. लवकरच राज्य शासनाकडून सुधारित अध्यादेश निघेल, असा विश्वास श्री. भोसले- पाटील यांनी उपोषणस्थळी दिला.
पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाने इस्लामपूरचे नामांतर करण्याचा निर्णय जाहीर केला.विधान परिषदेत आमदार सदाभाऊ खोत यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर विधानसभेत मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला असल्याचे सांगत नामांतराचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जाहीर केले.
गेल्या पाच दशकापासून नामांतर करण्याची मागणी हिंदुत्वादी संघटनाकडून केली जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही इस्लामपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत ईश्वरपूर नावाचा जाहीर उल्लेख केला होता. राज्य शासनाने नामांतराला मान्यता देत तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला असला तरी या नावात उरूण असा उल्लेख केल्याचे जाहीर केलेले नाही. यामुळे ईश्वरपूर नामांतर करत असताना उरण ईश्वरपूर करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने एकत्र येत केली आहे. तसे नगरपालिका प्रशासन आणि राज्य शासनाला निवेदनही दिले आहे.
दरम्यान, गावाचे नामांतर करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून आपणास विचारायला हवे होते असे सांगत आमदार जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा निर्णय लोकभावना लक्षात घेउन केल्याचे सांगत नाराजी दुर्लक्षित केली आहेे. आगामी नगरपालिका निवडणुकीत नामांतराचा विषय चर्चेला राहणार हे मात्र निश्चित. यावरून राजकीय श्रेयवादही चांगलाच रंगणार आहे. शिवसेना शिंदे गटानेही नामांतराची घोषणा होताच, फटाके फोडत आनंद साजरा केला. तर महायुतीतील अन्य घटक पक्षांनी आमदार सदाभाउ खोत यांच्यासमवेत आनंदोत्सव साजरा केला होता.