Ajit Pawar Warning to Ministers: राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर नागपूर येथे घेण्यात येत आहे. आज शिबिराच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष अजित पवार यांनी या शिबिरात आपली भूमिका मांडत असताना पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीतीबाबत भूमिका मांडली. तसेच पक्षातील शिस्तीबाबत पदाधिकारी आणि थेट मंत्र्यानाही खडे बोल सुनावले. जर पक्षाचे आदेश पाळले नाहीत तर खुर्ची सोडावी लागेल, असाही इशारा अजित पवार यांनी दिला.
चिंतन शिबिराची सुरुवात झेंडावंदन करून झाली. यावरून अजित पवार यांनी नाराजी थोडी नाराजी व्यक्त केली. “सकाळी ९.३० वाजता झेंडावंदन करण्यात आले. यावेळी काही मंत्रीदेखील उशीरा आले. पुढच्या वेळेस ९.३० ला एखाद्या कार्यक्रमाची वेळ असेल तर त्याचवेळेला दरवाजा बंद करायचा. जसे विमान टेकऑफसाठी वेळेचे कडक नियम पाळले जातात, बोर्डिंगचे दरवाजे बंद केले जातात. तसेच नियम यापुढे पक्षात पाळायला हवेत. पक्षाने एक दिवस वेळेवर येण्यास सांगतो, तरीही काही जणांना त्याचा त्रास होतो.”
मंत्र्यांना आणि नेत्यांना कानपिचक्या देताना अजित पवारांनी स्वतःच्या वक्तशीरपणाचे उदाहरण दिले. मी सकाळी ६.३० वाजता फिल्डवर जातो, तेव्हाही तिथे लोक उपस्थित असतात, असे ते म्हणाले. “आपल्यावर आलेल्या जबाबदारीचे भान सर्वांनीच ठेवायला हवे”, असे अजित पवार म्हणाले.
मंत्र्याना निर्वाणीचा इशारा
सर्व मंत्र्यांनी मुंबईत किती दिवस थांबणार, मतदारसंघात किती दिवस राहणार आणि पालकमंत्री म्हणून त्या त्या जिल्ह्यात काय कामगिरी करणार याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे देणे अनिवार्य आहे, असा निर्वाणीचा इशाराही अजित पवार यांनी दिला.
“पक्षापेक्षा मंत्री महोदयांना जर इतर महत्त्वाची कामे अधिक असतील तर ते मंत्रीपद आपण मोकळे करूया आणि ते पद दुसऱ्या कुणाला तरी देऊया. म्हणजे त्यांना कळेल” – अजित पवारांचा मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा.
नाहीतर खुर्ची सोडावी लागणार…
बदललेल्या राजकारणाचा अनुभव सांगताना अजित पवारांनी म्हटले की, मी किंवा छगन भुजबळ राजकारणात आलो, त्यावेळेसचे राजकारण आताच्या राजकारणात जमीन-आकाशाचा फरक पडला आहे. आता सोशल मीडिया प्रभावी ठरतोय. काही लोक काम न करता प्रसिद्धी मिळवतात. तर काही जणांना काम करूनही त्यामानाने प्रसिद्धी मिळत नाही.
“ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मिळाले आहे, त्यांना त्या जिल्ह्यात जावेच लागेल. तिथे गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, आमदार यांना बरोबर घेऊन लोकांमध्ये फिरावे लागेल. कधी कधी पालकमंत्री त्या जिल्ह्यात गेल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे बघतही नाही. त्यांच्याशी बोलतही नाही. अरे बाबांनो, कार्यकर्ता पक्षाचा घटक आहे. असे करू नका. माझ्यासह सर्वांना चुका दुरूस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची मोकळी करावी लागेल”, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला.