मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाल्याने, मूळ शिवसेना कोणाची? आणि धनुष्यबाण कोणाचं? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. तसेच निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे गटाला मूळ शिवसेना कोणाची? याबाबतचे पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे.

अशी एकंदरीत परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठं विधान केलं आहे. बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर ते वेगळा पक्ष काढू शकतात आणि वेगळं चिन्ह ठरवू शकतात. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असं विधान त्यांनी केलं आहे. ते बारामतीत पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “चीनला व्यवसाय देण्यासाठीच ‘हर घर तिरंगा’ मोहीम”; नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारलं असता, शरद पवार म्हणाले, “धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या विचारांपासून स्वीकारलेलं हे चिन्ह आहे. त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं आणि त्यातून वाद-विवाद निर्माण करणं योग्य नाही. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर, ते जरूर स्वत:चा पक्ष काढू शकतात आणि स्वत: वेगळं चिन्ह ठरवू शकतात.”

हेही वाचा- “भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, कारण…”, शरद पवारांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझेही काँग्रेससोबत मतभेद झाले होते. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष काढला आणि वेगळं चिन्ह ‘घड्याळ’ घेतलं. आम्ही त्यांचं चिन्ह मागितलं नाही किंवा वाद वाढवला नाही. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत” असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.