Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai पालघरच्या चारोटी येथील ब्रिजवर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांचा दुर्देवी मृ्त्यू झाल्याची माहिती पालघरच्या जिल्हा अधीक्षकांनी दिली आहे. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करा; फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश
सारयस मिस्त्री यांच्या निधनावर शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. “सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाची बातमी धक्कादायक आहे. असं काही घडेल यावर विश्वासच बसत नाहीये. देशाच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. प्रसिद्धीपासून दूर राहिलेले सायरस मिस्त्रींनी नेहमीच देशासाठी भरीव कामगिरी केली आहे”, असं शरद पवार म्हणाले.
देशातील अनेक प्रकल्पात साररस मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान
रतन टाटांनंतर टाटा समूहाचे अध्यक्षपद सायसर मिस्त्रींकडे आले. सायरस मिस्त्री हे मितभाषी, अधिक कष्ट करणारे आणि व्यवसायात त्यांचं बारकाईने लक्ष होतं. या देशातील अनेक प्रकल्पात साररस मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. गेल्या काही वर्षामध्ये मिस्त्री यांच्या कुटुंबाला अनेक धक्के बसले आहेत. संकटाची मालिका या मिस्त्री घरावर सुरु असल्याचं दिसतयं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यास मदत करो, अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.