हर्षद कशाळकर

अलिबाग- आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला असून काँग्रेसमधील कार्यकर्ते-स्थानिक नेते फोडाफोडीचा सपाटा लावत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची कोंडी करण्यास आणि विस्तारास सुरुवात केली आहे. पण रायगडमध्ये प्रभावी नेतृत्व नसल्याने काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीसमोर हतबल झाला आहे. 

अलिबागमधील काँग्रेस पक्षाचे तरुण नेते अमित नाईक आणि चारुहास मगर, रेवसचे सरपंच मिच्छद्र पाटील यांनी नुकताच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला मावळचे आमदार सुनील शेळके हेदेखील उपस्थित होते. नाईक यांच्या पक्षप्रवेशामुळे खारेपाट विभागात पक्षाला बळ मिळेल असा विश्वास यावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. नाईक यांच्यावर अलिबाग मुरुड मतदारसंघाची जबाबदारी यावेळी सोपविण्यात आली. तर मगर यांची पक्षाच्या  सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. 

  अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील नेतृत्व म्हणून अमित नाईक यांच्याकडे पाहिले जात होते. गेली वीस वर्षे ते काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. अलिबाग तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी यापूर्वी भूषविले होते. मात्र काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या निधनानंतर त्यांनी पक्षापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.   अलिबाग मुरुड मतदारसंघात पूर्वी शेकाप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख राजकीय पक्ष होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची मतदारसंघात सातत्याने पीछेहाट सुरू  झाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेसला पक्षांतर्गत बंडखोरीलाही सामोरे जावे लागले होते. यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली होती. मधुकर ठाकूर यांच्या निधनानंतर पक्षाला एकसंध बांधून ठेवेल असे नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आता नवीन पर्यायांच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. अशावेळी पक्ष बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जनाधार असलेल्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांच्या फळीची गरज आहे. या पक्षप्रवेशामुळे पक्षाला अलिबाग तालुक्यात हातपाय पसरण्याची आयती संधी प्राप्त झाली आहे. आगामी निवडणुकीत या पक्षप्रवेशाचा काय फायदा पक्षाला होईल याबाबत उत्सुकता आहे. यानिमित्ताने अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची कोंडी करण्याची आयती संधी राष्ट्रवादीला मिळाली आहे.