“माझ्या अंगावरच्या कातड्याचे जोडे काढून जरी घातले तरी…,” धनंजय मुंडे भरसभेत गहिवरले

“जीवनात कधीच कोणाचं मन दुखावून नाही तर जिंकून स्थान निर्माण केलं आहे”

बलात्काराच्या गंभीर आरोपानंतर महिलेने तक्रार मागे घेतल्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांनाही चोख उत्तर मिळाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान बलात्काराच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचलेल्या धनंजय मुंडेंचं एकदम जंगी स्वागत करण्यात आलं.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धनंजय मुंडे बीड व शिरुर कासार तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. यावेळी समर्थकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीमधून धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. “जिथे जाईल तिथे लोकांचे प्रेम, गावोगाव स्वागत-सत्कार अनुभवून मी भारावून गेलो. तुम्हा सर्वांचे हे प्रेम आणि आशीर्वाद मला कोणत्याही संकटाशी तोंड द्यायची प्रेरणा देतात,” अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

पाहा फोटो >> बलात्काराच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जंगी स्वागत; जेसीबीवरुन फुलांची उधळण

शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ग्राम सचिवालयाचे धनंजय मुंडेंच्या लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “कातड्याचे जोडे घातले तरी परतफेड होणार नाही,” अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी समर्थकांचे आभार मानले.

“अशा कठीण प्रसंगी आपण सर्व माझ्या पाठिशी उभे राहिलात त्याबद्दल शब्दांत आभार मानू शकत नाही. पण एक सांगतो आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरच्या कातड्याचे जोडे काढून जरी घातले तरी होऊ शकत नाही याची मला जाणीव आहे,” असं सांगताना त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.

“आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे. जीवनात कधीच कोणाचं मन दुखावून नाही तर जिंकून स्थान निर्माण केलं आहे. आपलंही मन जिंकलंय म्हणून एवढं मोठं स्वागत केलं,” असंही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp dhananjay munde grand welcome by supporters in beed sgy

ताज्या बातम्या