बीडमध्ये धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद काही जनतेला नवा नाही. या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळाले आहेत. मात्र, त्यापलीकडे जाऊन या बहीण-भावंडांमध्ये असलेलं नातं देखील काही प्रसंगी समोर येतं. शनिवारी संध्याकाळी भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर धनंजय मुंडेंनी हे ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“योग्य उपचार आणि काळजी घ्या”

धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या व्हिडिओतील माहितीचा संदर्भ ट्वीटमध्ये दिला आहे. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणं आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचं समजलं. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेनं लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो”, असं धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

दरम्यान, प्रीतम मुंडे यांनी देखील भावाच्या सदिच्छांना प्रतिसाद देत “धन्यवाद!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

“ताईसाहेब…”, पंकजा मुंडेंच्या टीकेला धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

प्रीतम मुंडेंनी पोस्ट केला होता व्हिडिओ!

खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून लोकांना आवाहन करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. “गेल्या आठवड्यात १४ ते १८ एप्रिलमध्ये जिल्ह्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. १८ तारखेला मुंबईत आल्यानंतर मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा हे लक्षणं जाणवायला लागले. २१ तारखेला मी RTPCR चाचणी केली. पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण सगळ्यांना मी आवाहन करते की फक्त RTPCR चाचणी निगेटिव्ह आली, म्हणून आपल्याला करोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणं असतील, तर त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मी देखील माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घरीच आयसोलेशनमध्ये राहून मी घेत आहे”, असं प्रीतम मुंडे या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp dhananjay munde wish speedy recovery to sister bjp mp pritam munde pmw
First published on: 25-04-2021 at 13:10 IST