Eknath Khadse News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमीत्त बाहेरगावी गेलेले असताना त्याच्या जळगाव येथील शिवराम नगरमधील घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. याबद्दल स्वतः एकनाथ खडसे यांनी माहिती दिली आहे.
चोरीची ही घटना रात्री घडली आहे. घरामधील सर्व सामान उचकले आहे. काही सामान चोरी गेले आहे. माझ्या खोलीत ३५ हजार रुपये होते आणि चार सोन्याच्या अंगठ्या होत्या. नंतर एकंदरीत सात ते आठ तोळे सोनं तेथून चोरी गेले आहे. घरातील सगळं सामान उचकलं आहे. एकंदरीत या घटनेमध्ये चोरी हाच उद्देश दिसतोय, असे एकनाथ खडसे टीव्ही९ या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. पोलिसांच्या तपासाबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, तासापूर्वीच ही घटना उघड झाली, त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.
चोरीची घटना किती वाजता घडली याबद्दल सांगता येणार नाही. कारण चोरी झाल्या त्या वेळी नेमका वॉचमन जागेवर नव्हता त्यामुळे याबद्दल सांगता येणार नाही. चोरट्यांनी वेळ घेऊन सर्व खोल्या तपासलेल्या दिसत आहेत, शांततेत सर्व कुलपं तोडलेली आहेत, असे खडसे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात राष्ट्रीय महामार्गावरील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून एक लाखाहून अधिक रक्कम लुटली होती.
या घटनेनंतर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचीच संपत्ती सुरक्षित नसल्यावर सर्व सामान्य नागरिकांचे काय, वर्दळीच्या ठिकाणी भरवस्तीत असलेल्या पेट्रोल पंपावर रात्री अकाराच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडत असेल तर पोलीस यंत्रणा काय करत आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.
