scorecardresearch

मुंब्र्यात दाढीचा वस्तरा जरी सापडला…; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना जाहीर आव्हान; म्हणाले “१८ तास राबावं लागतं”

मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू, राज ठाकरेंचा आरोप

मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज यांनी मनसैनिकांना दिला आणि आक्रमक हिंदूत्वाचा पुरस्कार केला. दरम्यान यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.

राज ठाकरेंनी पवारांवर जातीपातीच्या राजकारणाची टीका केल्याने राऊतांनी सुनावलं, म्हणाले “त्यांच्या चरणाशी…”

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. “राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन,” असं जाहीर आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिलं. “मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमाने राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका,” असं ही यावेळी आव्हाड म्हणाले.

मदरशांवर धाडी घाला आणि मशिदींवरील भोंगे काढा; राज ठाकरे यांच्याकडून हिंदूत्वाचा पुरस्कार

“कळवा-मुंब्रा मतदारसंघात ६७ टक्के हिंदू आहेत आणि ३३ टक्के मुसलमान आहेत. त्यात मी कळव्यातून ५७ हजार मतांनी विजयी झालो. कळव्यातून ३० हजारची आणि आणि मुंब्र्यातून ४५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. लोक कामावर मत देतात, जाती पातीवर नाही. १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे लागते,” असंही आव्हाड यांनी म्हटलं.

“महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा. प्रबोधनकारांची पुस्तकं वाचली तर जात-पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील. शरद पवार साहेबांचे नाव घेतले की महाराष्ट्रात चर्चा होतेच हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

“जातीपातीचे राजकारण आपण कधी बंद करणार आहात. झेंडा पाहून घ्या एकदा,” असा सल्लाही यावेळी आव्हाडांनी दिला.

“६ डिसेंबरला चैत्यभूमीला भेट देणाऱ्या बंधू भगिनींबद्दल आपण काय बोललात हे कुणी विसरलेले नाही. नुसत्या मिरवणूका काय काढायला सांगता. संविधानाचा सन्मान राखीन अशी शप्पथ घ्या. तुमचे भाषणच संविधान विरोधी होते आणि हो भाषणाच्या शेवटी जयभीम देखील म्हणा,” असा सल्ला आव्हाडांनी यावेळी दिला.

“शिवरायांच्या महाराष्टात गाडलेल्या जेम्स लेनला परत वरती काढायची गरज नव्हती. जेम्स लेनचे जन्मदाते हे कोण होते हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. जे गेले त्यांच्याबद्दल बोलणे आमच्या संस्कृतीत नाही,” असंही यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले –

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. तासाभराच्या जोशपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेला पािठबा देत एकीकडे उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील कारभाराचे कौतुक केले, तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभारावर सडकून टीका केली.

राजकारण्यांमुळे झोपडपट्टय़ा वाढल्या. ‘मातोश्री’ बंगल्याच्या बाहेर पडल्यावर जवळच बेहरामपाडा या परिसरात हजारो झोपडय़ा उभ्या राहिल्या. यातील काही झोपडय़ा तर चार-चार मजल्यांच्या आहेत. बेहरामपाडा किंवा अन्य झोपडपट्टय़ांमधील परिस्थिती काय आहे, याचा कोणी विचार करीत नाही. झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये काय चालते, हे पोलिसांकडून ऐकल्यावर धोका लक्षात येतो. सरकारच्या धोरणांमुळे पोलिसांचे हात बांधलेले आहेत. पण धोका टाळण्यासाठी झोपडपट्टय़ांमधील मदरशांवर धाडी घालाव्यात, अशी विनंती आपण पंतप्रधानांना करीत आहोत, असे राज म्हणाले.

मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी करीत युरोप किंवा अन्य कोणत्या राष्ट्रात असे भोंगे आहेत का, असा सवाल राज यांनी केला. पहाटे ५  वाजल्यापासून देण्यात येणाऱ्या बांगेमुळे सामान्य जनतेला त्रास होतो. हे भोंगे सरकारने उतरविले नाहीत तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात ध्वनीक्षेपक लावण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली. मी धर्माध नाही, पण धर्माभिमानी आहे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. तसेच लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे  त्यांनी जाहीर केले.

शरद पवार यांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज यांनी केला. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले तरी त्यांना मंत्री करण्यात आले. दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरून दुसरे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली. कसले हे राष्ट्रवादीचे राजकारण, असा सवालही राज यांनी केला. आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवित आमदारांनी मागणी केली नसताना घरे देण्यामागे पैसे काढण्याचा हेतू आहे का, असा सवालही राज यांनी केला. खासदार-आमदारांना देण्यात येणारे निवृत्त वेतनही बंद करण्याची मागणी ठाकरे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp jitendra awhad on mns raj thackeray mumbra madarsa sgy