राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी धीरगंभीर असल्याचे दिसतात. पण कधी कधी त्यांची विनोदबुद्धी जागृत होते. त्यामुळे ते शाब्दिक कोट्या करण्याचा प्रयत्न करतात. या शाब्दिक कोट्या अनेकदा त्यांच्या अंगलट आलेल्या आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे शेतकरी मेळावा आणि नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी भाषणादरम्यान असाच विनोद केला, ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले.
शेतकरी मेळाव्यात भाषण करत असताना अजित पवार म्हणाले, “गडहिंग्लजधील नूल वासियांनी हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, मंडलिक आणि माझं चांगलं स्वागत केलं. हे स्वागत मी कधी विसरू शकणार नाही. महिला भगिनी, मुली सर्वजन आमच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करत होते. काही मुली आम्हाला हळूच पाकळ्या फेकून मारत होत्या. पाकळ्या फेकल्यानंतर त्या हसत होत्या. “कसं याला मारलं..”, असं त्या कदाचित मनात म्हणत असतील.”
अजित पवार पुढे म्हणाले, “हा गमतीचा भाग असल्यामुळे सोडून द्या. शेवटी त्या आपल्या मुली आहेत. आज त्या विद्यार्थीनी आहेत. उद्या कुणाच्या तरी घरी लक्ष्मी म्हणून जाणार आहेत. या मुलींवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील आहे.”
माझ्या हातात तिजोरीच्या चाव्या
शेतकरी मेळाव्यात बोलत असताना अजित पवार यांनी हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचे म्हटले. “माझ्या हातात तिजोरीच्या चाव्या असून तिजोरी उघडत असताना पहिल्यांदा वंचित घटकांना, आदिवासी, शेतकरी वर्गाला कशी मदत होईल, हा प्रयत्न मी आजवर करत आलो आहे. पुढेही करत राहिल”, असे ते म्हणाले.