नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विधान केलं होतं. संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नाहीतर ‘स्वराज्यरक्षक’ होते, असं अजित पवार म्हणाले. याविरोधीत सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाने राज्यभरात आंदोलन केली होती. अखेर अजित पवारांनी चार दिवसांनी प्रसारमाध्यमांसमोर येत संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ होते, यावर ठाम असल्याचं सांगितलं होतं.
यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. “तुम्हाला उठसूठ लोकांना टपली मारण्याचा अधिकार दिलेला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. एखाद्या गोष्टीवर किती मोठी प्रतिक्रिया येते, त्याचा अनुभव तुम्ही घेतला आहे. आम्ही कोणाची काळजी करत नाही आणि घाबरत देखील नाही. तुम्ही कोणाला घाबरत नाही तर चार दिवस कुठे लपून बसला होता. त्यामुळे दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो आहे, हे लक्षात ठेवल पाहिजे,” असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला.
याला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अधिवेशन शुक्रवारी संपलं. शनिवारी मुंबईत आलो. रविवारी १ जानेवारी होती, तर २ तारखेपासून पुन्हा कामाला सुरुवात केली. कुठं लपून बसलो होतो. मी घाबरून बसणारा नाही आहे,” असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं.
हेही वाचा : महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी नेतृत्व कोण? राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ नेत्याचं घेतलं नाव, म्हणाले…
पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यावर चंद्रकात पाटील म्हणाले, “जो झोपलेले आहे, त्याला उठवणं फार सोपं असतं. पण, झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवणं फार कठीण असतं,” अशा शब्दांत सुप्रिया सुळेंना चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला आहे.