महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना कुटुंब नियोजनाचा मंत्र दिला आहे. आपल्या सुनेला किंवा मुलीला दोन मुलांवरच थांबायला सांगा. दोन मुली झाल्या तरी तिसरं अपत्य होऊ दे असं नको. वंशाचा दिवा पाहिजे असा हट्ट धरू नका. मुलगीही कर्तबगार असते असं अजित पवार यांन म्हटलं आहे. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत गरजू महिलांना स्वेटर, साडी आणि शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी उपस्थितांना उद्देशून अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाले अजित पवार?

तुम्ही एवढ्या महिला आहात, तुम्हाला जाता जाता एकच सांगतो तुम्हाला आवडो किंवा न आवडो. आपली सूनबाई आली किंवा तुमची मुलगी असेल आणि तिचं लग्न झालं तर त्यांना सांगा की दोन अपत्यांवरच थांब. बाकी अजिबात काही वाढवावाढवी करू नका. दोन्ही मुली झाल्या तरी सोन्यासारख्या असतात. कर्तबगार असतात, त्यामुळे मुलगाच पाहिजे असा अट्टाहास नको.

शरद पवार एकाच मुलीवर थांबले की नाही?


आता शरद पवार एकाच मुलीवर म्हणजे सुप्रियावर थांबले की नाही? सुप्रिया ही साहेबांचं नाव पुढे घेऊन चालली आहे. वंशाचा दिवाच पाहिजे असा काही हट्ट धरू नका. कशाचा दिवा पाहिजे? मुलगीही कर्तबगार असते त्यामुळे कुटुंब मर्यादित ठेवा. नाहीतर उगाच देवाची कृपा देवाची कृपा म्हणत पलटण वाढवू नका. मर्यादित कुटुंब सुखी राहतं. देवाची कृपा नाही आम्हालाही कळतं कुणाची कृपा होते. त्यामुळे दोन अपत्यांच्या वर मुलं होऊ देऊ नका. अशी माझी विनंती तुम्हाला आहे. गंमतीचा भाग सोडून द्या पण मी काय सांगतो आहे ते समजून घ्या असंही अजितदादा म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या बारामतीत कुणाचे लाड खपवून घेणार नाही

माझ्या बारामतीत मी कुणाचेही लाड खपवून घेणार नाही. आपल्या बारामतीत प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला सुरक्षित वाटलं पाहिजे. माझ्याजवळ बसला असेल आणि तोही चुकत असेल तर कारवाई करा. काल काहीतरी घटना घडली, आधीही काही झालं. पण मी हे खपवून घेणार नाही. इथे प्रत्येकाला सुरक्षित वाटलंच पाहिजे. अनेकजण चार पिढ्यांपासून आमच्यासोबत आहेत. कुणी चुकत असेल तर मी मुळीच खपवून घेणार नाही असंही अजित पवार यांनी सांगितलं.