राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. पुरेसं संख्याबळ असताना देखील महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी पहाटे निकाल लागल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर सगळं उलट झालं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची समीकरणं कशी फिरली याबाबत बोलून दाखवलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर आणखी उलट झालं असतं. संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते, पण आमचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले.”

हेही वाचा- “…तर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपाला मतदान केलं असतं”, नवनीत राणा यांचा खळबळजनक दावा

मी स्वत: बैठकीत आमच्या आमदारांना निवडणुकीबाबत समजावून सांगितलं होतं. त्यासाठी अहमद पटेल यांचं उदाहरण देखील दिलं होतं. आपण दिलेलं मत आपल्या प्रतिनिधीला दाखवायचं आहे. पण ते दुसऱ्यांना दिसता कामा नये. अपक्षांनी कुठलंही मत कुणालाही दाखवता कामा नये. कागदावर कुठल्याही प्रकारची खूण, बिंदू किंवा वेडीवाकडी रेष असता कामा नये, हे सर्व नियम आम्ही आमच्या आमदारांना समजावून सांगितले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार निवडून यावेत, म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण दुर्दैवाने आमच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. अर्थातच ज्या काही चर्चा सुरू आहेत, महाविकास आघाडीला धक्का वगैरे, असं काहीही नाहीये. महाविकासआघाडीने सरकार स्थापन करताना ज्यावेळी बहुमत सिद्ध केलं, तेव्हा आम्हाला १७० आमदारांचा पाठिंबा होता. आता दोन चार मतं इकडे तिकडे झाली आहेत. पण याचा अर्थ हा महाविकास आघाडीला मोठा धक्का नाही, असंही ते म्हणाले.