महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक घटना म्हणून २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे राजभवनावर झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीकडे पाहीले जाते. या शपथविधीवरुन मागच्या तीन वर्षात अनेकदा राजकीय खडाजंगी झालेली पाहायला मिळाले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका दाव्यामुळे आणखी एक खळबळ होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदर फुटल्यामुळे सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली, हे नाकारता येणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयंत पाटील यांच्या या दाव्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जाऊ शकतात. २०१९ च्या त्या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभरात वादळ निर्माण झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत चर्चा सुरु असतानाच अचानक २३ नोव्हेंबरच्या सकाळी राजभवनावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीची कुणकुण इतर राजकीय पुढाऱ्यांसहीत माध्यमांनाही लागली नव्हती. इतकी गुप्तता यामध्ये पाळण्यात आली होती. मात्र केवळ साडे तीन दिवसांत हे सरकाळ कोसळलं आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला होता.