महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार हे नास्तिक असल्याचा उल्लेखही राज यांनी आपल्या भाषणामध्ये केला. याच टीकेवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीचा संदर्भ राज ठाकरेंच्या वयाशी जोडत टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
‘‘शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत. ते धर्म, देव मानत नाहीत. या पद्धतीनेच ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी जातीवाद भडकवतो आणि भूमिका बदलतो, यावर पवारांनी बोलावे का,” असा सवाल राज यांनी केला़  “विदेशी व्यक्ती पंतप्रधान नको, या मुद्यावर शरद पवार हे १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर मात्र ते काँग्रेसबरोबर जाऊन कृषीमंत्री झाले. पवारांनी आतापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या,” असेही राज म्हणाले.

नक्की वाचा >> “…मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची”; ‘जंत पाटील’ म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जयंत पाटलांचं उत्तर

मुस्लीम मतांवरुनही टीका…
‘‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली़  त्यामुळे छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्यासाठी आणि माथी भडकाविण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांची निर्मिती केल्याचा आरोपही राज यांनी यावेळी केला.

नक्की वाचा >> ‘रिंकिया के पापा’ गाण्याने स्वागत’, ‘क्या नेता बनेगा रे तुम लोग’ ते ‘महाराष्ट्र धर्म सोडला का?’; ठाण्यातील सभेआधीच राज ठाकरे ट्रोल

राष्ट्रवादीचा टोला…
राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी थेट शरद पवारांच्या वयाचा दाखला देत टोला लगावलाय. “शरद पवार हे सलग ५५ वर्षे सर्व निवडणुका जिंकत आले आहेत. राज ठाकरे यांचा जन्म झाला त्या दिवशी शरद पवारांना आमदार होऊन एक वर्षे झाले होते. राज ठाकरेंनी कोणत्या निवडणुकीत विजयी झाल्याचे कोणाला माहिती आहे का..?”, असा खोचक टोला रविकांत वरपे यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंसोबतचा फोटो शेअर केला
अन्य एका ट्विटमध्ये राज यांचा शरद पवारांसोबतचा फोटो पोस्ट करत वरपेंनी राज यांच्या टीकेला उत्तर दिलंय. “शरद पवार म्हणजे, सर्वांसाठी आधाराचा हात… सर्वांसाठी संकटात साथ ..!”, अशी कॅप्शनसहीत वरपे यांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांचा एका कार्यक्रमामधील हात पकडून चालताना फोटो ट्विट केलाय. याच ट्विटमध्ये त्यांनी, “जनहितास झोकून देणारा, काळोखास भेदणारा सौख्याच्या किरणांचा हा सूर्य महाराष्ट्राला लाभला,” अशा शब्दांमध्ये पवारांचं कौतुक केलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज यांनी ठाण्यातील सभेमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवरच निशाणा साधल्याचं दिसून आलं. यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावरही टीका केली.