सभागृहात गोंधळ घालून असंसदीय शब्द वापरल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी आव्हाड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्याला सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी पाठिंबा दिला.
विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तासावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून शेतकऱयांना देण्यात येणाऱया पॅकेजवरून गोंधळ घातला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही आव्हाड आणि विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. आव्हाड अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेतूनच सरकारवर टीका करीत होते. त्याचवेळी राज्याचे कामगार मंत्री प्रकाश मेहता आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी आव्हाड यांनी असंसदीय शब्द वापरल्यामुळे बापट यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आव्हाड यांच्या निलंबनाची घोषणा केली.