Prakas Solanke : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेप्रकरणी संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील काही आरोपी अद्याप देखील फरार आहेत. फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात विविध पक्षाचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके हे देखील सहभागी झाले होते. या मोर्चात बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेट धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…

आमदार प्रकाश सोळंके काय म्हणाले?

“मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील निषेधार्थ आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आज या घटनेला २० दिवस झाले आहेत. मात्र, या घटनेतील काही आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेलं नाही. मला एवढंच सांगायचं की गेल्या पाच वर्षांत धनंजय मुंडे हेच पालकमंत्री होते. तेव्हा पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं. कोणाला दिलं होतं तर वाल्मिक कराडला दिलं होतं. एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र आणि पालकमंत्र्यांचे सर्व अधिकार मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि प्रशासनावर आपली जरब बसवली. फोन करून सांगायचा की याला उचला. ३०७ मध्ये अडकवा, ३०२ मध्ये अडकवा, असे अनेक गुन्हे या परळीत दाखल आहेत”, असा हल्लाबोल प्रकाश सोळंके यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बीडमध्ये दररोज ३०० वाळूंच्या हायवा चालतात, त्या कोणाच्या आहेत? वाल्मिक कराडला शक्ती देणारे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेत न्यायाची अपेक्षा नाही. या निमित्ताने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करतो की, या घटनेचा निकाल लागेपर्यंत आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्यांचं (धनंजय मुंडे यांचं) मंत्रिपद काढून घ्या. ही बीड जिल्ह्यातील सर्व जनतेची मागणी आहे. आजचा आपला मोर्चा हे पहिलं पाऊल आहे. यानंतरही जर आरोपींना अटक झाली नाही तर या देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाहीत”, असा इशाराही आमदार प्रकाश सोळंके यांनी दिला आहे.