उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर भाष्य केलं आहे. शासकीय कर्मचार्यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून एका कर्मचार्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन तीन कर्मचारी काम करू शकतात, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांनी अप्रत्यक्ष टीकास्र सोडलं.
रोहित पवार यांनी ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटलं. याचदृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.”
हेही वाचा- सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास…”
“बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, ‘शासन आपल्या दारी’च्या प्रत्येक सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातींवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च केले, पण अशावेळी काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळपट्टी शासनाला चालते. मग नोकर भरतीसाठीच शासन एवढा बारीक विचार का करते?” असा सवालही रोहित पवारांनी विचारला.
हेही वाचा- “एका शासकीय कर्मचार्याच्या पगारात खासगी कंपनीचे ३-३ कर्मचारी काम करू शकतात” – अजित पवार
रोहित पवार पुढे म्हणाले, “सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही सरकार पारदर्शक परीक्षा घेऊ शकलं नाही. असं असताना आता सरकार खासगी कंपन्यांना फायदा देण्याच्या हेतुने कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहे. केंद्र सरकारप्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.”
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
शासकीय कर्मचार्यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून एका कर्मचार्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन-तीन कर्मचारी काम करू शकतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे असून यापैकी २ लाख ४० हजार कोटींचा खर्च केवळ वेतनावर होतो, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले.