गेल्या दोन दिवसांपासून भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. “कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही, तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत”, असं चंद्रकांत पाटील नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलले होते.

दरम्यान, त्यांच्या या विधानाचा निषेध म्हणून शनिवारी त्यांच्यावर शाईफेकीची घटना घडली. चिंचवडगावमधील मोरया देवस्थानच्या एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी ११ पोलिसांना निलंबित केलं आहे. त्यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, पोलिसांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत मनोज भास्कर घरबडे ( समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“विचारांचा विरोध विचारांनीच व्हावा”

यासंदर्भात एकीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शाईफेकीचा निषेध केला असताना आता आमदार रोहित पवार यांनीही या शाईफेकीच्या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवारांनी ट्विटरवरून या प्रकाराविषयी भूमिका स्पष्ट केली. “चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचारांच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे”, असं रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांवरील हल्ल्याचा अजित पवारांकडून निषेध; म्हणाले, “कोणालाही कायदा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते अजित पवार?

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अशाच प्रकारे शाईफेकीचा निषेध केला आहे. “असले प्रकार कोणीही करता कामा नये. राजकीय किंवा इतर क्षेत्रातील व्यक्तीने काहीही बोललं असेल तर कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे, मी त्याचा निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्याचं समर्थन कोणीही करीत नाही. त्यावर आम्ही भूमिका मांडली आहे. कायदा कोणीही हातामध्ये घेऊ नये. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं करणं अतिशय अयोग्य असून मी त्याचाही निषेध व्यक्त करतो”, असं अजित पवार म्हणाले आहेत.