सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नजरेसमोर ठेवूनच भुजबळ यांना मंत्रिमंडळात पुन्हा सामावून घेतले असावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.पवार म्हणाले, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने ओबीसी समाजासाठी खेळी केली आहे. भुजबळांना विनापद ठेवणे महायुतीमध्ये कोणालाही परवडणारे नव्हते.

भुजबळ यांना मागील महायुती सरकारमध्येही मंत्रिपद देण्यात आलेले होते. नव्या सरकारमध्ये सुरुवातीला काही महिने मंत्रिपद दिलेले नव्हते. डावलल्यावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. असे असताना भुजबळ यांना विनापद मोकळे ठेवणे महायुतीमध्ये कुणालाही परवडणारे नव्हते. यामुळेच त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद बहाल केल्याचे दिसत आहे.

आघाडीत एकमेकांचा सन्मान हवा

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट असे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार आहेत. यात जागावाटप करताना एकमेकांचा मान-सन्मान राखायला हवा. तिन्ही घटक पक्षांना पक्षांना आता नव्याने बांधणी करावी लागेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.