Sanjram Jagtap Ajit Pawar Meeting: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार संग्राम जगताप चर्चेत आले आहेत. संग्राम जगताप यांनी वारंवार आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका मांडल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली. खुद्द अजित पवारांनीदेखील संग्राम जगताप यांचे कान टोचल्यानंतरही त्यांनी याबाबतची विधानं कायम ठेवल्यानंतर शेवटी पक्षानं त्यांना नोटीस बजावली. यासंदर्भात मंगळवारी मुंबईत अजित पवारांशी संग्राम जगताप यांची सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संग्राम जगताप यांनी काही सूचक विधानं केली.

दिवाळीच्या काळात हिंदूंनी फक्त हिंदूंच्याच दुकानांमधून साहित्याची खरेदी करावी, असं जाहीर आवाहन संग्राम जगताप यांनी केल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला. यासंदर्भात अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर संग्राम जगताप लवकरच भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मंगळवारी बैठक झाल्यानंतर संग्राम जगताप यांना संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.

भाजपा प्रवेशावर काय म्हणाले संग्राम जगताप?

आपल्याबद्दल फार पूर्वीपासून अशा चर्चा होत आहेत, असं संग्राम जगताप यावेळी म्हणाले. “अशा घडामोडींशी कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध जोडण्याचं काम कोणत्याही व्यक्तीने करू नये. चर्चा चालू असतात. निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. आता कुठल्या निवडणुका नाहीत. माझ्याबाबतच्या या चर्चा आज नाही, २०१४ साली पहिल्यांदा आमदार झाल्यापासून चालूच आहेत”, असं संग्राम जगताप यावेळी म्हणाले.

माझ्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अडचण नाही – संग्राम जगताप

दरम्यान, आपल्या आक्रमक भूमिकांमुळे पक्षाची कोणतीही अडचण होत नसल्याचं संग्राम जगताप म्हणाले. “निवडणुकांचा आढावा मुंबईत झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला. मला पाठवलेल्या नोटीसवर अजित पवारांशी माझी अंतर्गत चर्चा झाली आहे. माझ्या भूमिकेमुळे पक्षाची कुठेही अडचण होत नाही. आज सविस्तर चर्चा झालेली आहे. आमची चर्चा झाली. ती पक्षांतर्गत चर्चा असते”, असं संग्राम जगताप म्हणाले.

बैठकीनंतर नरमाईची भूमिका? आता विकासाचे मुद्दे!

एकीकडे आपल्या भूमिकांमुळे पक्षाची अडचण होत नसल्याचं म्हणणाऱ्या संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना अहिल्यानगरच्या विकासाच्या मुद्द्यांवर बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बैठकीनंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

“या निवडणुकीत अहिल्यानगरमधील प्रश्न, अडचणी, विकासकामं याबद्दल स्थानिक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी आज भूमिका मांडली. विकास कामांबाबत, शहराच्या विकासाबाबत मुद्दे मांडले”, असं ते म्हणाले. “शिव-शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रात आहेच. मी ती विचारझारा मानतोच. सगळेच ही विचारधारा मानतात. या विचारधारेनुसारच काम चालू आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.