न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात भरवल्या जात आहेत. बड्या राजकीय व्यक्ती अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसेदेखील देत आहेत. जिकरीचा आणि तेवढाच रोमहर्षक खेळ असल्यामुळे बैलगाडा शर्यतींना प्रेक्षकदेखील मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. सध्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीमधील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी बैलगाडा जुंपत असल्याचे दिसत असून कोल्हे यांनी तिच्या हिमतीची दाद दिलीय. कोल्हेंनी या मुलीचा व्हिडीओ ट्विट केला असून तिला रणरागिणी म्हटलंय.

अमोल कोल्हे म्हणाले शाब्बास गं रणरागिणी

अमोल कोल्हे यांनी जुन्नर येथे भरलेल्या बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिक्षा विकास पारवे नावाची मुलगी बैलगाडा जुंपताना दिसत आहे. तिच्या याच हिमतीचे कोल्हे यांनी कौतूक करत तिला रणरागिणी म्हटलंय. “शिवजन्मभूमीच्या मातीतील शेतकऱ्याच्या लेकीही मागे नाहीत! जी मायेनं बैलपोळ्याला पुरणपोळी खाऊ घालते ती घाटात गाडा जुंपण्याची हिंमतही दाखवते. दिक्षा तू महाराष्ट्रातील शूरवीर महिलांच्या परंपरेला साजेसं काम करून दाखवलंय. तुझ्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे,” असं म्हणत अमोल कोल्हे यांनी व्हिडीओतील मुलीचं कौतूक केलंय.

बैलगाड्यासमोर केली होती घोडेस्वारी

दरम्यान, अमोल कोल्हे यांनादेखील बैलगाडा शर्यतीची खास आवड आहे. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बैलगाडा शर्यतीसमोर घोडेस्वारी करण्याचा शब्द दिला होता. तोच शब्द न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला मान्यता दिल्यानंतर पूर्ण केला. त्यांनी १६ फेब्रुवारी रोजी खेडमधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाड्यापुढे घोडेस्वारी केली होती. त्यांच्या या घोडेस्वारीचा व्हिडीओ नंतर चांगलाच व्हायरल झाला होता. खुद्द अमोल कोल्हेंनी घोडेस्वारी करतानाचा तो व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसिद्ध होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.