राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत पुढील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली. २०२४ ला आम्ही बारामती जिंकणार आहोत, सुप्रिया सुळे यांनी दुसरं ‘वायनाड’ शोधावं असं विधान बावनकुळे यांनी केलं आहे.

बावनकुळेंच्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळेंच्या विधानाबाबत विचारलं असता अमोल कोल्हे म्हणाले की, “सुप्रिया सुळे ह्या आमच्या पक्षाच्या लोकसभेतील नेत्या आहेत. संसदेतील सदस्यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार दिला जातो, सुप्रिया सुळेंना ‘महासंसदरत्न’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांची कामगिरी आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे.”

हेही वाचा- बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला? मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

“शेवटी त्यांचं काम बोलतं, इतर कुणी काहीही बोललं तरी याने फारसा फरक पडत नाही. जनता सुज्ञ आहे. जनतेनं सातत्याने सुप्रिया सुळेंवर विश्वास दाखवला आहे. हाच विश्वास जनता पुढेही १०१ टक्के कायम ठेवेल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे सध्या कोणी काही बोलत असेल तर अजून बरंच पाणी पुलाखालून वाहून जायचं आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृतवाहिनीशी संवाद साधत होते.

हेही वाचा- भाजपाचं मिशन बारामती! पवारांच्या बालेकिल्ल्यात बावनकुळेंची मोठी घोषणा; म्हणाले, “कुणाचाही गड…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “प्रत्येक पक्षाला महत्त्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीच्या नाड्या आपल्या हातात असाव्यात किंवा आर्थिक राजधानीवर आपल्या पक्षाची सत्ता असावी, असं भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाला वाटत असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही. मुंबईतील जनतेचं कल्याण झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबई अत्यंत महत्त्वाची आहे, हा विचार कायम मनात राहिला पाहिजे.”