हिंगोलीतील काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी हिंगोलीत हजेरी लावत असताना राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवाजी माने मात्र शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. सोमवारी सेनेचा भगवा रुमाल गळय़ात घालून वारंगा फाटा येथून मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून सेनेच्या प्रचाराला त्यांनी उघड सुरुवात केली. माने यांना राष्ट्रवादीने स्वीकारलेच नव्हते, असे मत आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केले.
आघाडीच्या वाटपात हिंगोलीची जागा काँग्रेसला सुटल्यानंतर माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माने यांच्या गटात तीव्र नाराजी पसरली. माने यांचा रुसवा काढण्यासाठी जिंतूरचे आमदार बोर्डीकर यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांचा रुसवा काही गेला नाही. सूर्यकांता पाटील प्रचारात उतरल्या नसल्या तरी अजून तरी उघडपणे सातव यांच्या विरोधात भूमिका जाहीर केली नाही. माने यांची माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे यांच्या निवासस्थानी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, सातव, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या उपस्थितीत बठक झाली. माने यांचा रुसवा काढण्याचे या सर्वानी प्रयत्न केले. आता माने कामाला लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, माने हे सेनेचा छुपा प्रचार करीत असल्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होती. त्यावर आमदार दांडेगावकर यांनी माने राष्ट्रवादीत समरस झाले नव्हते, त्यांनी परस्पर मुंबईत पक्षात प्रवेश केला होता. कधी अधूनमधून राष्ट्रवादीच्या बठकीत ते हजरही असतील. मात्र, ते मनाने राष्ट्रवादीत मिसळले नव्हते. त्यांना राष्ट्रवादीने स्वीकारले नव्हते. ज्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचा आदर नाही, तो नेत्यांचे आदेश मानत नाहीत, तो जरी पक्षाचा म्हणत असेल तरी त्याला अर्थ नाही. नेतृत्वाने ठरविलेले निर्णय कार्यकर्त्यांसाठी बंधनकारक असतात. माने यांच्या भूमिकेचा काहीही परिणाम निवडणुकीवर होणार नसल्याचे दांडेगावकर म्हणाले.
माने यांनी सोमवारी खुलेआम गळय़ात भगवा रुमाल घालून वारंगा फाटा येथून कळमनुरी, बोल्डा, वाई मागे औंढा नागनाथकडे दुचाकी रॅली काढली. माने यांच्या भूमिकेमुळे सेनेला काही प्रमाणात मदत होईल. सेनेला जय महाराष्ट्र करून माने काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले. लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केल्याने ही जागा काँग्रेसला जाहीर झाल्यानंतर त्यांनी भारिप-बहुजन महासंघ व मनसेकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्या पक्षांनी प्रतिसाद दिला नाही. सातव यांच्यावर नाराज असलेल्या माने यांनी अखेर गळय़ात भगवा रुमाल घालून दुचाकी रॅलीच्या माध्यमातून सेनेच्या प्रचाराला उघड सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp shivaji mane hot key in shiv sena proneness
First published on: 15-04-2014 at 01:55 IST