महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आषाढी एकदशीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी शरद पवारांवर जो विश्वास जनता दाखवते आणि विरोधकही दाखवतात त्यावर भाष्य केलं. एवढंच नाही तर भाजपाच्या जनसंवाद यात्रेवरुनही त्यांना टोला लगावला. ” महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार काम करत आहेत. आम्हाला मायबाप जनतेने साथ दिली आहे. तसंच विरोधकही शरद पवारांकडे येत आहेत, अपेक्षेने बघतात. यातच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ आणि शरद पवार भेटीवर भाष्य केलं.
पूजा खेडकर प्रकरण हे सरकारने गोपनीय पद्धतीने हाताळलं पाहिजे
पूजा खेडकर प्रकरणात रोज काहीतरी नवीन होतं आहे. याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. या प्रकरणातलं काहीही लिक होता कामा नये. या गोष्टी सरकारसाठी चांगल्या नाहीत. अशा गोष्टी संवेदनशील असतात. रोज ब्रेकिंग कशी होते? नवी माहिती कशी समोर येते? सरकार काय करतं आहे? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानते, कारण त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली
पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमचा युक्तिवाद ऐकून घेतला. आम्हाला आता ऑगस्ट महिन्यातली तारीख दिली आहे. नागालँड येथील आमदारांचं निलंबन, महाराष्ट्रातल्या आमदारांचा प्रश्न आणि चिन्ह आणि पक्ष चुकीच्या पद्धतीने काढून घेतला. त्याबाबतची ही केस आहे. सर्वोच्च न्यायालयात मी उपस्थित होते. बाकी ज्यांच्या मागे अदृश्य शक्ती आहे त्यांच्यापैकी कुणी आम्हाला तिथे भेटत नाही. त्यांचे वकील आम्हाला जरुर भेटतात. कारण त्यांचे जे वकील आहेत त्यापैकी अनेकांशी आमचे घरोब्याचे संबंध आहेत. अदृश्य शक्तीकडून ही सगळी यंत्रणा चालवली जाते.
हे पण वाचा- सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी, बाहेर आल्यानंतर कारणही सांगितलं; म्हणाल्या, “मी आज..”
आयुष्यात नाती महत्त्वाची असतात
मी आशाकाकींना भेटले, त्यांचा आशीर्वाद घेतला, कारण कौटुंबिक नाती ही आयुष्यात महत्त्वाची असतात. यश, अपयश, सत्ता, पैसा येत असतो जात असतो शेवटी नातीच राहतात, मात्र सुनेत्रा पवार जेव्हा शरद पवार यांच्या भेटल्या तेव्हा त्यांनी आशीर्वाद का घेतला नाही? याचं उत्तर त्याच देऊ शकतात, असंही भाष्य सुप्रिया सुळेंनी केलं. वारी आज पंढरपूरला पोहचते, माऊली माऊली म्हणत शेतकरी पेरण्या करुन जातो तो कळसाचं दर्शन घेऊन माघारी येतो. पांडुरंगाच्या चरणी जाऊन तो चांगलं वर्ष जावं असं साकडं घालतो.
भाजपाला सुप्रिया सुळेंनी विचारले सहा प्रश्न
भाजपा पक्ष जनसंवाद यात्रा काढून कधीतरी खरं बोलणार असेल तर मी त्यांचं स्वागत करते. भाजपाच्या लोकांना माझे हे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं त्यांनी त्यांच्या मित्रपक्षांनी द्यावीत अशी मागणी करत सुप्रिया सुळेंनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
१) “भाजपाची भ्रष्टाचार या विषयावर काय भूमिका आहे याबद्दल खरं सांगावं”
२) “ज्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले त्यांचं नक्की काय झालं? ते भ्रष्टाचारी होते की नाही?”
३) “दूध, कांदा आणि हमीभावावर भाजपाची भूमिका काय? ती त्यांनी स्पष्ट करावी.”
४) “महागाईबाबत त्यांचं काय मत आहे? जगातलं अर्थकारण, राज्याचं अर्थकारण, महाराष्ट्राने काढलेलं कर्ज याबद्दल भूमिका मांडावी”
५) “ज्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत त्यासाठी महाराष्ट्र सरकारे निधी आहे का? का जुमलेबाजी आहे?”
६) “बेरोजगारीवर भाजपाची आणि सरकारची भूमिका काय? मित्र पक्षांनीही याबाबत बोलावं.”

नक्की या सरकारमध्ये काय चाललं आहे? RSS ने दोन आरोप केले आहेत तो म्हणजे १८० कोटींचा भ्रष्टाचार शेती मंत्रालयात झाला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि भाजपा बोलणार का? संघाने जो प्रश्न देवेंद्र फडणवीसांकडे मांडला त्याचं पुढे काय झालं? हे सांगावं. आज एका मोठ्या आणि महत्त्वाच्या विवेक नावाचं मासिक आहे त्यातल्या लेखांवरची उत्तर भाजपाने पारदर्शकपणे द्यावीत. महाराष्ट्रापुढे पारदर्शक योजना मांडावी असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.