NCP-SCP MLA Jitendra Awhad on Sanatan Dharma : काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात वातावरण तापलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर चव्हाणांनी या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ नव्हे तर ‘सनातनी दहशतवाद’ असं म्हणायला हवं अशी टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतर चव्हाण यांच्याविरोधात आंदोलनं चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं अशी टिप्पणी आव्हाड यांनी केली आहे.
सनातन धर्म व सनातनी हे विकृत आहेत असं सांगायला कोणी घाबरू नये, अशा शब्दांत आव्हाड यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. आव्हाड यांनी यावेळी सनातन धर्माने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक नाकारला, संभाजी महाराजांना बदनाम केल्याचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केल्याचा दाखला दिला.
“सनातन धर्मामुळे भारताचं वाटोळं झालं”
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सनातन धर्मामुळे भारताचं वाटोळं झालं. सनातन धर्म नावाचा कोणताही धर्म कधी अस्तित्वातच नव्हता. आपण हिंदू धर्माचे अनुयायी आहोत. मी या सनातन धर्माविषयी नेहमीच बोलत आलेलो आहे. या धर्माशी संबंधित लोकांनी जे काही लिहून ठेवलंय, जे काही देशात पसरवलंय त्यामुळेच आपल्या देशात वर्णव्यवस्था वाढली, धर्मद्वेष वाढला, उच्च व नीच या राजकारणाचा खेळ सनातन धर्मामुळेच सुरू झाला.”
सनातनी लोकांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, शंभूराजांना बदनाम केलं : आव्हाड
आमदार आव्हाड म्हणाले, “तथाकथित सनानत धर्माने, त्यांच्या लोकांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. याच सनातन धर्माने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. सनातन धर्माच्या अनुयायांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकलं, त्यांच्या अंगावर घाण फेकली. हाच सनातन धर्म शाहू महाराजांच्या जीवावर उठला होता. याच सनातन धर्माने व त्यांच्या अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाणी पिण्यास, शाळेत जाण्यास मनाई केली होती.”
सनातन धर्म व सनातनी लोक विकृत : आमदार आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सनातन धर्माने देशाचं वाटोळं केलेलं असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याविरोधात बंड पुकारलं, त्यांनी मनुस्मृती जाळली, तसेच त्या काळातील अन्यायकारी परंपरा नाकारल्या. मनुस्मृती लिहिणारा व्यक्ती देखील याच सनातनी परंपेरतून जन्माला आला होता. सनातन धर्म आणि सनातनी विचारसरणी ही विकृत आहे, ही गोष्ट सांगताना आपण घाबरू नये.”