राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्याची मालकी असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यामधील मालमत्तेवर ईडीने शुक्रवारी जप्तीची कारवाई केली. यावेळी ईडीने ५०.२० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर सविस्तर भूमिका व्यक्त केली होती. माझ्यावर कितीही दबाव आणला तरी मी भाजपामध्ये जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी एक्स अकाऊंटवरून काका अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘भाजपामध्ये जायला पाहिजे का?’, ईडीने ५० कोटींची जप्ती आणताच रोहित पवारांची पोस्ट

काय म्हणाले रोहित पवार?

“युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने ८०० कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे”, अशी भूमिका रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मांडली.

तुम्ही कोणत्या धरणाच्या सिंचनातून साम्राज्य उभारलं?

रोहित पवार पुढे अजित पवारांना उद्देशून म्हणाले, “पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का? माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीये. हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही शंभर दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही.”

Rohit Pawar tweet on ajit pawar
रोहित पवार यांनी केलेले ट्विट

रोहित पवारांनी तोट्यातले कारखाने विकत घेतले?

शुक्रवारी ईडीने ‘बारामती ॲग्रो लि.’ कंपनीची मालकी असलेल्या ‘कन्नड सहकारी कारखाना लि.’ या कारखान्याची १६१.३० एकर जमीन, प्लांट, यंत्र आणि इमारत इत्यादींवर जप्तीची कारवाई केली. या संपत्तीची एकूण रक्कम ५०.२० कोटी असल्याचे ईडीने सांगितले आहे. रोहित पवार यांच्या बारमती ॲग्रो आणि अन्य कंपन्यांनी संगनमताने संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे खरेदी केल्याचा आरोप आहे. कन्नड सहकारी साखर कारखानाही (एसएसके) रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने ५० कोटी रुपयांना खरेदी केला. ‘बारामती ॲग्रो’ने कन्नड एसएसके खरेदी करण्यासाठी लागलेला पैसा कोठून आणला, याचाही ईडी तपास करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी एक्स अकाऊंटवर आपली भूमिका मांडली. “माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?”, अशी प्रतिक्रिया देऊन रोहित पवार यांनी स्माईलीची इमेज टाकली आहे. पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय”, असेही रोहित पवार म्हणाले.