राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून दिल्लीतील भाजपा नेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात वाढ झाली आहे. मुंबई, बारामती अशा महत्त्वाच्या ठिकाणी केंद्रीय नेते दौरा करत असून, शिवेसना आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आव्हान उभं करत आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामतीचा दौरा करत आहेत. भाजपा नेत्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री महाराष्ट्र दौरा करत असून शिवसेना आणि राष्ट्रवादी मजबूत असणाऱ्या ठिकाणांना टार्गेट केलं जात आहे का? असं विचारण्यात आलं असता पवार म्हणाले “कोणत्याही राजकीय पक्षाला आपलं भवितव्य मजबूत करण्यासाठी कार्यवाही करण्याचा अधिकार आहे. त्या पक्षाला एखाद्या भागात, मतरदारसंघात चिंता वाटत असेल तर तिथे अधिक कष्ट करणं चुकीचं नाही. हा त्यांचा अधिकार आहे”.

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले “गुजरात किंवा देशात…”

“बारामतीमध्ये देशाच्या अर्थमंत्री येत असल्याने सुप्रिया सुळेंनी त्यांचं स्वागत केलं आहे, आम्हाला आनंद आहे. अरुण जेटली माझ्या मतदारसंघात आल्यानंतर माझ्याच घऱी मुक्कामाला होते. प्रधानमंत्री स्वत: आले होते. आल्यानंतर आपल्या ज्ञानात भर पडल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जीदेखील आले होते. त्यामुळे अर्थमंत्री येत असतील तर त्याचाही आनंद आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

पत्रा चाळ प्रकरणातील आरोपावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे असं वाटत नाही. इतर राज्यातही त्यांनी कार्यक्रम आयोजित केले असून, हा राजकीय पक्षाचा अधिकार आहे. त्यांना निवडणुकीची चिंता सतावत असेल. संपूर्ण देशाचं चित्र पाहिलं तर केरळ, तामिळनाडू, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाबमध्ये भाजपाचं राज्य नाही. कर्नाटक, तामिळनाडूत त्यांनी सत्ता पलटवली. मध्य प्रदेशात कलमनाथ यांचं सरकार फोडाफोडी करुन पाडलं. उत्तर प्रदेश, गुजरात अशी काही राज्यं सोडली तर देशात भाजपासाठी अनुकूल चित्र दिसत नाही. त्याची नोंद घेत पक्षाचा विस्तार करण्याचं धोरण हाती घेतलं असेल तर तो त्यांचा अधिकार आहे,” असंही शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar on bjp central ministers baramati maharashtra visit sgy
First published on: 21-09-2022 at 14:21 IST