देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये कायमच टीका टिप्पणी सुरु असल्याचे पाहायला मिळते. आता तर लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका केल्याशिवाय राहत नाहीत.

अशातच एका सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. “पोरं शाळा सोडून गेले तरी शाळा कधीही बंद पडत नाही”, असा अप्रत्यक्ष टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट…”

जयंत पाटील काय म्हणाले?

“सर्वांनी अनेक शाळा पाहिल्या आहेत. पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा कधी बंद पडत नाही. पुन्हा नव्यानं पोरं घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो. आमचा हेडमास्तर लई खमक्या आहे. शरद पवार साहेब म्हणजे मतांचा विषय नाही. तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे. हे मी महाराष्ट्रातील गावागावत गेल्यावर पाहतो आहे”, असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात लोकसभेची निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडणार आहे. यातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होत असून यातील १९ एप्रिल आणि २६ एप्रिल अशा दोन टप्प्यांसाठी मतदान झाले. आता महाराष्ट्रात अजून ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होत असलेली ही लोकसभेची निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.