सांगली लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत मित्र म्हणून व्यासपीठ गाजविणा-या राष्ट्रवादी काँग्रेसने अखेरच्या क्षणी महायुतीच्या कमळाला मताचे दान करीत धोबीपछाड दिल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. सहा महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून यावेळच्या लोकसभा निवडणुकीची राजकीय गणिते मांडली गेल्याने येणारा काळ काँग्रेसच्या कसोटीचा ठरण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीतून आलेल्या संजयकाका पाटील यांना उमेदवारी पहिल्या टप्प्यात जाहीर केल्याने आयात उमेदवाराची चर्चा जोरदार झाली. पण संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीचा त्याग करण्यासारखी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसने फारसा केला नाही. नोटिसा बजावून पक्षातील पॅचअप करण्याचे प्रयत्न मतदानाला २४ तास उरले असतानाही सुरू होते.  
सांगली मतदारसंघ हा आघाडीच्या जागा वाटपानुसार काँग्रेसच्या वाटय़ाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने या जागेवर हक्क सांगितला नसला तरी २००९ च्या निवडणुकीत अपक्षच्या माध्यमातून मतदारसंघावर किंबहुना जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला होता.  २००९ मध्ये अपक्ष अजित घोरपडे आणि काँग्रेसचे प्रतीक पाटील यांच्या झालेल्या लढतीत काँग्रेसला अवघे ३९७८३ चे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य पार होऊ शकते हा विश्वास राष्ट्रवादी अंतर्गत असणा-या कुरघोडय़ांमुळे बळावत गेला.
संजयकाका पाटील यांना साथ देणा-यांमध्ये जतचे विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे अजित घोरपडे हे उघडपणे पुढे आले. अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनीही आघाडी धर्म खुंटीला बांधून राजकीय भवितव्य विचारत घेत भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला. याच बरोबर एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या महापालिका निवडणुकीत काढणारे एका पंगतीला बसतील अशी चिन्हे सुरुवातीपासून दिसत नव्हती. त्याची परिणीती महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य सदस्य मतदानाच्या दिवशी उघडपणे भाजपाच्या प्रचारात अग्रेसर राहिले. केवळ प्रचारात अग्रेसर राहिले असे नव्हे तर प्रत्यक्ष मतदान बूथवर ठिय्या मारून कमळाला भरभरून मते देण्याचा प्रयत्न सांगलीत झाला.
महापालिकेच्या राजकीय क्षेत्रात मिरज पॅटर्न म्हणून ओळख असणा-या मिरजेनेही या निवडणुकीत ऐनवेळी जसे जमेल तसे निर्णय घेऊन काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एकमेकाला शह देत मात्र सत्ता स्थाने मिळवित असताना एकमेकांचा हात हाताच घेण्याचा मिरज पॅटर्न महापालिका क्षेत्रात यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही पुढे आला.
सांगली, मिरजेतील स्थिती संदीग्ध असताना ग्रामीण भागाने पारंपरिकता सोडत परिवर्तनाच्या लाटेत भरभरून मताचे दान यंत्रावर टाकले. मतदानाची वाढलेली टक्केवारी विद्यमान सदस्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरू शकते. हे राजकीय बदल केवळ वारसा हक्काने मिळणारी सत्तास्थाने अबाधीत ठेवणा-याना इशारा देणारे आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज राष्ट्रवादीबाबत ही स्थिती निर्माण झाली असली तरी भारतीय जनता पक्षाला फारसा आनंदोत्सव साजरा करता येणार नाही. कारण हे राजकीय ध्रुवीकरण होण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्याच तासगांव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे सुमारे ७३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. वाढलेली मतदानाची टक्केवारी आर.आर. आबांच्या दृष्टीनेही चिंतेची बाब ठरणार आहे. पक्षांतर्गत असणारा छुपा संघर्ष आणि समोर असणा-या राजकीय विरोधकांना एकाच वेळी त्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
इस्लामपूरचे पार्सल परत पाठविण्याची चर्चा महापालिका निवडणुकीत काँग्रेसने मोठय़ा प्रमाणात घडवून आणली. जयंत पाटील यांनी कधी व्यासपीठावरून, कधी बठक घेऊन आघाडी धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या. मात्र बहुसंख्य त्यांचेच कार्यकत्रे या निवडणुकीत आघाडीला धर्माला हरताळ फासीत भाजपाच्या विजयासाठी जीवाचे रान करीत होते. हा राजकीय व्यवहार नव्या समीकरणाची नांदी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supported to big alliance in sangli
First published on: 20-04-2014 at 04:30 IST