सामान्य मतदार डोळस झाला असून झपाटय़ाने निर्णय घेतले नाही, तर राजकीय पक्षांनाही जागा दाखवू शकतो. लोकसभा निवडणुकीत ही किमया मतदारांनी साधली असून राष्ट्रवादी काँग्रेस झालेल्या चुकांची दुरुस्ती करीत लोकांच्यापर्यंत जाणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. लोकसभा निवडणूक ही दोन राजकीय पक्षांमध्ये होण्याऐवजी नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस प्रणीत आघाडी अशी झाली असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासन निर्णय घेत असताना धोरण लकवा समोर आल्याने त्याचे परिणाम लोकांच्या रोषाला कारणीभूत ठरले. इथून पुढे झपाटय़ाने निर्णय घेण्याची भूमिका शासनाला घ्यावी लागेल. विधानसभा निवडणुका एकत्रितपणेच लढवाव्या लागतील. महागाई, गॅस वितरणातील गोंधळ हे घटक लोकांच्या नाराजीला कारणीभूत ठरले. सामान्य माणसाला उपयुक्त ठरणारी अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करीत असताना त्रुटी राहिल्या. याच बरोबर राजीव गांधी आरोग्य विमा योजनेचा लाभ प्रशासकीय अडथळयांमुळे सामान्यांपर्यंत मिळू शकला नाही. मराठा आरक्षणाचा निर्णय आचारसंहितेमुळे जाहीर करता आला नाही. या पुढील काळात जनतेत जाऊन गरसमज दूर करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीने स्वीकारली आहे. जनतेचा कौल मान्य असून आमच्या चुका दुरुस्त करण्याची संधी असल्याने आम्ही त्या प्रयत्नात आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्याधुनिक प्रसार माध्यमांचा कल्पकतेने वापर केला. आम्ही मात्र पारंपरिक पद्धतीने रस्त्यावर प्रचार करीत होतो. आणि मोदी मात्र वाहिन्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचले. अमेरिकेनंतर प्रसिद्धी माध्यमांचा चांगल्या पद्धतीने वापर मोदींनी केला. 
हातकणंगले मतदार संघात आघाडीने चांगले काम केले. मात्र ऊस दराबाबत लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला संशय दूर करण्यात आम्ही उणे पडलो. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी विरोधात काम केले असले तरी त्याची दखल पक्ष घेईलच. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील, भाजपाच्या विजयी मिरवणुकीत हजर असतात. खासदारांच्या अभिनंदनाचे फलक लागतात याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्षच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगिले. 
वाळवा विधानसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेपेक्षा २४ हजार मतांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी पिछाडीवर आहे, याची दखल घ्यावी लागेल. झालेल्या चुकांपासून आम्ही बोध घेतला असून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न या पुढच्या कालावधीत केला जाईल, असे सांगून जयंत पाटील म्हणाले की, सांगली महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आपण आलो असून महापालिका क्षेत्रात कोणती भूमिका घ्यायची याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.
  संग्रहित लेख, दिनांक 28th May 2014 रोजी प्रकाशित  
 राष्ट्रवादी चुकांची दुरुस्ती करणार – जयंत पाटील
सामान्य मतदार डोळस झाला असून झपाटय़ाने निर्णय घेतले नाही, तर राजकीय पक्षांनाही जागा दाखवू शकतो. लोकसभा निवडणुकीत ही किमया मतदारांनी साधली असून राष्ट्रवादी काँग्रेस झालेल्या चुकांची दुरुस्ती करीत लोकांच्यापर्यंत जाणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
  First published on:  28-05-2014 at 03:30 IST  
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp will correct the errors jayant patil