सातारा: कासवरून साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरचालकाने पादचाऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक दाबल्याने डंपर घाटातच उलटला. त्यामध्ये दोन मुली गंभीर जखमी झाल्या. डंपरचालक किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अलका महसूद मुलाणी, अमुल्या महसूद मुलाणी (दोघी रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा) अशी जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहराच्या दिशेने कास बाजूकडून डंपर भरधाव वेगाने येत होता. पॉवर हाऊस झोपडपट्टी येथील पाच मुली यवतेश्वर घाटात फिरायला गेल्या होत्या.

फिरत असताना त्या रस्ता ओलांडत होत्या. अवघड वळणावर समोरून आलेला डंपर त्यांना दिसला नाही. घाटातल्या वळणावर अचानक मुली रस्ता ओलांडत असल्याचे डंपर चालकाच्या निदर्शनास येताच त्याने त्या मुलींना वाचवण्यासाठी ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्याने डंपर जागीच उलटल्याने मोठा आवाज झाला.

या अपघातात दोन मुली जखमी झाल्या. तसेच डंपरचालकही किरकोळ जखमी झाला. तत्काळ स्थानिकांनी मदतकार्य करून त्याची माहिती पोलिसांना दिली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे जवान विशाल मोरे घटनास्थळी पोहोचले तसेच शाहुपुरी पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. जखमी झालेल्या दोन्ही मुलींना तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत शाहुपुरी पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.