तुरळक तक्रारींचे अपवाद वगळता परीक्षा सुरळीत
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी काही तक्रारींचे अपवाद वगळता सुरळीत पार पडली. भौतिकशास्त्रची प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी अवघड, तर रसायनशास्त्रआणि जीवशास्त्रची प्रश्नपत्रिका मध्यम स्वरूपाची होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ‘नीट’ सोपी असल्याचे परीक्षार्थ्यांकडून सांगण्यात आले.
एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस अशा विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) एकूण १५४ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यानुसार पुण्यासह राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांनी ओळखपत्राची मूळ प्रत न आणल्याने त्यांना परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षेला बसू न देण्याचे काही प्रकार घडले. कागदपत्रांवरून काही ठिकाणी वादाचे प्रकारही घडले. मात्र, एनटीएने ओळखपत्राची मूळ प्रत सोबत ठेवण्याची दिलेली सूचना न पाळल्याने त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले.
विद्यार्थ्यांना दिलेल्या माहितीनुसार प्रश्नपत्रिकांमध्ये चुकीचे प्रश्न किंवा छापील चुका नव्हत्या. जीवशास्त्रची प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी सोपी होती, तर रसायनशास्त्रची प्रश्नपत्रिका मध्यम स्वरूपाची होती. भौतिकशास्त्रच्या प्रश्नपत्रिकेत गणितावर आधारित प्रश्न असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका अवघड वाटली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नक्कीच सोपे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एनटीएने यंदाही काटेकोर सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. विद्यार्थ्यांना बूट, पूर्ण बाह्यंचे शर्ट, गॉगल, घडय़ाळ, ब्रेसलेट असे काहीही परीक्षा केंद्रात नेता येणार नसल्याची सूचना एनटीएकडून या पूर्वीच देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून या सूचनेचे पालन करण्यात आल्याचे चित्र होते, तर विद्यार्थ्यांचे साहित्य सांभाळण्यासाठी पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले.
मुंबईत उशिरा प्रश्नपत्रिका दिल्याची तक्रार
वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मुंबईत कांजूरमार्ग येथील एका केंद्रावर उशिरा प्रश्नपत्रिका देण्यात आल्या, मात्र वेळ वाढवून देण्यात आला नाही अशी तक्रार विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. दुपारी अडीच वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात आली. दरम्यान अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिका परतही घेण्यात आल्या. दिलेल्या वेळेनंतर अगदी एक किंवा दोन मिनिटे उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मज्जाव करण्यात आला. मुंबईसारख्या शहरातील अंतरे, येथील प्रश्न लक्षात घेता पाच-दहा मिनिटांचा उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला हवा, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुरक्षारक्षकांकडून विद्यार्थ्यांची फारशी अडवणूक करण्यात आली नाही. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी व्यवस्थित करण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार घडले नाहीत, असे पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.