धाराशिव : आठ दिवसांपूर्वी विवाह झालेले दाम्पत्य फिरण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात आले होते. किल्ल्यावरील उपली बुरूजावरून सेल्फी फोटो घेत असताना वार्‍याच्या झोकामुळे नवविवाहितेचा तोल गेला आणि बुरूजावरून खाली पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तुळ) येथील अमीर शेख हे आपली पत्नी व दोन नातेवाईकांसह किल्ला पाहण्यासाठी किल्ल्यात आले होते. अमीर शेख व त्याची पत्नी निलोफर शेख यांचा आठ दिवसांपूर्वी म्हणजेच २० मे रोजी विवाह झाला होता. फिरायला जायचे म्हणून ते नळदुर्गचा किल्ला पाहण्यासाठी आले होते. किल्ल्यात गेल्यानंतर त्यांनी इतर स्थळांची पाहणी केली. त्यानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील सर्वात उंच असणार्‍या उपली बुरुजावर गेले. याठिकाणी उपली बुरुजावर गेल्यानंतर नवविवाहिता निलोफर यांना बुरुजावरून सेल्फी काढण्याचा मोह झाला. यावेळी वारा सुटलेला होता.

आणखी वाचा-दिव्यांग मुलींच्या स्वच्छतेची ‘जागृती’, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनविशेष

सेल्फी काढण्यासाठी निलोफर शेख या बुरुजाच्या कडेला गेल्यानंतर त्यांचा तोल जावुन त्या बुरुजावरून खाली पडून गंभीर जखमी झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा पती अमीर शेख व इतर दोन नातेवाईकही बुरुजावरच होते. घटनेची माहिती मिळताच तत्काळ त्याठिकाणी असणार्‍या युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी व निलोफरच्या नातेवाईकांनी किल्ल्यात असणार्‍या वाहनांमधून गंभीर जखमी झालेल्या निलोफरला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच निलोफरचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.