Nilesh Rane Withdraw Retirement Marathi News : केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी अचानकपणे जाहीर केलेली राजकीय निवृत्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अवघ्या २४ तासांत मागे घेतली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेले मतभेद दूर करण्यात आले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं काम करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी राणे आणि चव्हाण या दोघांनाही दिल्या आहेत. फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर राणे आणि चव्हाण यांच्यातील मतभेद मिटले आहेत.
दरम्यान, अवघ्या २४ तासांत निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर नीलेश राणे यांनी आज (२७ ऑक्टोबर) सिंधुदुर्ग येथे शक्तीप्रदर्शन केलं. तसेच आगामी निवडणुकीत पक्षासाठी काम करणार असल्याचं राणे यांनी जाहीर केलं. नीलेश राणे म्हणाले, मी आता पक्षासाठी काम करत राहणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यांनी मला विश्वास दिला. त्यांच्या विश्वासावर आता कामाला लागलोय. कार्यकर्ते जोशात आहेत.
नीलेश राणे म्हणाले, ज्या गोष्टी आहेत किंवा होत्या, त्या मी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्या आहे. त्या गोष्टी मी इथे सांगणार नाही. आपल्या नेत्याशी बोलल्यानंतर त्या गोष्टी सार्वजनिकरित्या सांगणं बरोबर नाही. राज्यात आता भाजपामय वातावरण आहे. या गोष्टीचं समाधान आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. मला काही मिळवायचं नव्हतं. जे काय होतं, ते जिथे सांगणं गरजेचं आहे, तिथे मी सांगितलं आहे.
नीलेश राणे यांनी निवृत्तीची घोषणा का केली?
सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांबरोबरच्या मतभेदांमुळे आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांच्या कामांसाठी शासकीय निधी मिळत नसल्याने नीलेश राणे यांनी समाजमाध्यमांवरून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्याशी चर्चा केली आणि नीलेश राणे यांच्याशी संवाद साधला.
हे ही वाचा >> “पंतप्रधानांनी दोन वर्षांपूर्वी बारामतीत येऊन…”, शरद पवारांवरील टीकेनंतर संजय राऊतांचा टोला
राणेंच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेल्या कामांसाठी जिल्हा निधीतून पुरेशी आर्थिक तरतूद केली जात नाही आणि त्यांना मंजुऱ्याही मिळत नाहीत. नीलेश राणे हे विधानसभेसाठी इच्छुक असून ग्रामपंचायत व अन्य निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने आणि चव्हाण यांच्याकडून राजकीय कोंडी केली जात असल्याने राणे यांचे सहकारी नाराज होते. त्यामुळे नीलेश राणे यांनी निवृत्ती जाहीर केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी नीलेश राणे यांची भेट घेऊन मनधरणी केली. या दोन्ही नेत्यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी चर्चा केली. कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने राणे नाराज होते. आता राणे यांनी सुचवलेल्या कामांसाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.