राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध भाजपा आणि बंडखोर शिवसेना आमदार अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. २१ जून रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काही सहकाऱ्यांसोबत बंडखोरी करुन सूरतला गेल्यापासून सुरु झालेल्या या सत्तासंघर्षादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी बैठकींचा सापटा लावला आहे. अशाच एका बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरुन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिलीय.

मंगळवारी म्हणजेच २८ जून २०२२ रोजी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंचं बंड आणि राजकीय परिस्थितीसंदर्भात भाष्य केलं. “भाजपाला बैठका घ्यायचा अधिकार आहे. आमचं दडपशाहीचं सरकार नव्हतं आणि कधी असणारही नाही. त्यामुळे भाजपाला त्यांच्या बैठका घ्यायच्या असतील तर तो त्यांचा अधिकार आहे,” असं सुप्रिया यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार टिकेल का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी काही ज्योतिषी वगैरे नाहीये, पण मला असं वाटतंय की, कुठल्याही कुंटुबात भांड्याला भांडं लागलं किंवा मुलगा-मुलगी रुसून गेली तर आई-वडील सगळं पोटात घेऊन तो प्रश्न सोडवतात. त्यामुळे बंडखोर आमदारांचं जे काही म्हणणं आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडायला हवा, चर्चेतून मार्ग निघतो.” पुढे बोलताना, ‘दुनिया उमीद पे कायम है’ असं म्हणत “महाविकास आघाडी सरकार टिकेल,” असा आशावाद सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांच्या संख्येवरुन प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं.

“एकनाथ शिंदेंकडे १४४ चं बहुमत नाहीय. मी ऐकलंय त्याप्रमाणे त्यांच्याकडे ५० आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे असं म्हणता येणार नाही,” असं सुप्रिया सुळेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. एएनआय या वृत्तसंथेनं सुप्रिया यांचं हेच विधान ट्विटरवरुन शेअर केल्यानंतर ते ट्विट कोट करुन त्यावरुन निलेश राणेंनी सुप्रिया यांना लक्ष्य केलं आहे.

“हे बघून हसावं की रडावं समजत नाही. काही किती हुशार खासदार आपल्या देशाला मिळाले आहेत, राष्ट्रवादी पक्ष ५४ (जागा) घेऊन सत्तेत आहे आणि ५६ (जागा असणाऱ्या शिवसेने)चा मुख्यमंत्री आहे,” असं ट्विट नितेश राणेंनी सुप्रिया यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदारांचं पाठबळ होतं. मात्र त्यापैकी शिवसेनेच्या ३९ आणि इतर अपक्ष अशा ५० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी उद्या म्हणजेच ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे.