धुळे : देशभरात गाजलेल्या साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील सामूहिक हत्याकांड प्रकरणातील नऊ  संशयितांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी जामीन मंजूर केला. सोलापूर जिल्ह्यातून भिक्षुकीसाठी भटकंती करणाऱ्या पाच जणांना एक जुलै २०१८ रोजी राईनपाडा गावात ठेचून मारण्यात आले होते. भटक्या विमुक्त जमातीतील डवरी गोसावी समाजातील हे पाच भिक्षूक होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील डवरी गोसावी समाजातील भिक्षुकांनी राईनपाडय़ापासून पाच ते सहा किलोमीटरवर झोपडय़ा उभारुन   मुक्काम ठोकला होता. महिला आणि मुलांना घरी सोडून एक जुलै २०१८ रोजी सकाळी या कुटुंबांमधील पाच जण राईनपाडय़ाच्या दिशेने भिक्षुकीसाठी गेले होते.  हे पाचही जण बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षा मागत असतांना मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा कोणीतरी पसरविल्याने जमावाने या पाचही जणांना ओढत, फरफटत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणले. याठिकाणी मिळेल त्या वस्तूने त्यांच्यावर वार करण्यात आले. लोखंडी खुर्च्या, टेबल, सळई, दगडांनी पाचही जणांना ठेचून मारण्यात आले.

या हत्याकांडप्रकरणी ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यातील २८ जणांना अटक झाली असून सात संशयित अजूनही फरार आहेत. २५ सप्टेंबर २०१८ रोजी पोलिसांनी धुळे जिल्हा न्यायालयात ३५ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले.

यानंतर संशयितांनी धुळे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. धुळे सत्र न्यायालयाने ३० मे २०१९ रोजी जामीन अर्ज फेटाळला. यानंतर अ‍ॅड. राहुल रघुवंशी यांच्यामार्फत १४ संशयितांनी औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्यासमोर बुधवारी कामकाज होऊन १४ जणांपैकी पैकी सिद्धार्थ गांगुर्डे, किशोर पवार, अजीत गांगुर्डे, राजू गवळी, सुकमल कांबळे, राजाराम राऊत, चुनीलाल माळीच, बंडू साबळे, गुलाब गायकवाड या नऊ जणांना जामीन मंजूर झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine suspects held in rainpada dhule mass murder case get bail zws
First published on: 15-08-2019 at 00:54 IST