राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीली जोर आला आहे. तसंच, विरोधी पक्षानेही तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तर, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी सरकारकडे केली. या सर्व पार्श्वभूमीवर आज पुन्हा ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स खात्यावरून सत्ताधारी पक्षांना टार्गेट करण्यात आलं आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे, महाराष्ट्रावर ‘अवकाळी’चं संकट आहे. तुम्ही चिंतेत आहात. अगदी पोटच्या पोराप्रमाणे काबाडकष्ट करून ह्या फळबागा, पिकं तुम्ही वाढवलीत. त्यासाठी अतोनात मेहनत घेतलीत. ती अशी मातीमोल होताना बघून तुम्हाला गहिवरून येणं, दुःख होणं साहजिक आहे. पण खचू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत.
“संकट आहेच. ते कुठं नसतं? पण ह्या संकटातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद तुम्हीच… बळीराजानंच तर आम्हाला दिलीय. अशा परिस्थितीत तुम्ही काही अविचार केला तर तुमच्यामागे असलेल्या तुमच्या कुटुंबाचं काय होईल? हा महाराष्ट्र तुमच्याकडे आशेनं पाहतोय. तुम्ही जगाचे अन्नदाते आहात. अशावेळी हा अन्नदाता हतबल झालेला आम्हाला पाहवेल का? कसं पाहवेल? नाहीच! त्यामुळे खंबीर रहा”, असं आवाहन ठाकरे गटाने केलं आहे.
हेही वाचा >> “आम्हाला गांजा लागवडीची परवानगी द्या”, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची थेट सरकारकडे मागणी
“सत्तेसाठी स्वतःच्या आईच्या पोटावर लाथ मारणाऱ्या ह्या निष्ठुर मिंधेंना काळ्या आईचं दुःख काय समजणार?”, असा सवालही त्यांनी विचारला आहे. पण तुमच्यासारखंच इमानाने जगणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना आणि शिवसेनेला तुमची जाण आहे. अवकाळीचं हे संकट तात्पुरतं आहे. ह्या संकटावर मात करून खंबीरपणे जिद्दीनं उभं राहूया!, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१ डिसेंबर) हिंगोलीतील शेतकऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सरकारला अवयव गहाण ठेवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने अवयव न विकता या संकटाला धीटपणे सामोरे जाण्याचे आवाहन केले.