‘पेटा’ संस्थेने याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती थांबल्या आहेत. तेव्हा पासून शेतकरी या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी धडपड करत आहेत. परंतु राज्य शासनाने शर्यती सुरु करण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बैलगाडी शर्यत संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, आता नेते मंडळींकडून देखील या शर्यती पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील यासाठी मागणी केली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ महाराष्ट्र सरकारने आता हळूहळू सगळ्याच गोष्टी सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज ही सुरू करण्यात यावी, अशी मागणी मी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. ग्रामीण भागात या बैलांची काळजी अक्षरशा आपल्या मुलांप्रमाणे घेतली जाते. म्हणून आमची मागणी एवढीच आहे, की सरकारने सगळ्या अटी शर्थी लागू कराव्यात आणि आम्हाला बैलगाडा शर्यत व बैलांची झुंज घेण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी मी आज केलेली आहे. ” असं भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक शेअर केलेल्या व्हिडओत म्हटलं आहे.

ऑगस्ट महिन्यात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीला चकवा देत सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून देत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यती आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडीच्या पठारावर शुक्रवारी पहाटे पार पडल्याचे समोर आले होते. तीन दिवसापासून पोलिसांनी ९ गावांमध्ये संचारबंदी आदेश लागू करूनही अखेर आंदोलक शर्यती घेण्यात यशस्वी ठरल्याने प्रशासनाची उणीव समोर आली होती.

आटपाडीत निर्बंध झुगारत बैलगाडा शर्यत

तर, “ राज्यात बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्ष नेत्यांना भेटून मागणी केली जाईल. या शर्यतींमध्ये शेतकरी वर्गच सहभागी होत असतो येथे कुणी व्यावसायिक सहभागी होत नाही. या शर्यतींचे ग्रामीण भागाशी एक वेगळं नाते असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे बैलगाडा शर्यत संघटनेच्या कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले होते.

बैलगाडा शर्यती आणि सराव पूर्ववत करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार – सुनील केदार

“ राज्यातील बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार आहे. ” पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी देखील ऑगस्ट महिन्यात सांगितले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane demand to start bullock cart race msr
First published on: 27-09-2021 at 20:06 IST