Nitesh Rane Demands No muslim shops at Nashik Kumbh Mela : नाशिक जिल्ह्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुंभमेळा भरणार आहे. मात्र या कुंभमेळ्यात केवळ हिंदू व्यावसायिकांचीच दुकानं लागली पाहिजेत. कुंभमेळ्यात मुसलमानांची दुकानं नकोत अशी भूमिका मंत्री व भाजपा नेते नितेश राणे यांनी घेतली आहे. यावर आता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने आक्षेप घेतला आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितलं की आम्ही नितेश राणे यांना नोटीस बजावणार आहोत आणि अशा वक्तव्यांवर स्पष्टीकरण मागणार आहोत.
प्यारे खान म्हणाले, नितेश राणे यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याचं जे वक्तव्य केलं आहे, त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. गेल्या ७० वर्षांपासून मुस्लिमांवर बहिष्कार होत आला आहे. मात्र, आता बहिष्कार घालण्यासारखं काहीही कारण नाही. तुम्ही मुस्लिमांवर बहिष्कार घालणार म्हणजे नेमकं काय करणार? त्यांच्या पंक्चरच्या दुकानात जाणार नाही? त्यांच्या चहाच्या दुकानावर किंवा भाजीपाल्याच्या दुकानावर तुम्ही बहिष्कार घालणार आहात का? मुस्लिमांवर आधीच्या सरकारने खूप बहिष्कार घातला मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
केवळ राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न : प्यारे खान
प्यारे खान म्हणाले, “देशभरातील लोक आस्थेने कुंभमेळ्यात येतात. अशावेळी कुणीतरी अशी चिथावणीखोर भाषणं करून लोकांच्या श्रद्धेत, त्यांच्या प्रार्थनेत कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नये. या देशात सर्वांनाच राहायचं आहे. नितेश राणे यांनी मुस्लीम विक्रेत्यांबद्दल थुंकी लावून सामान विकण्यासह जे दावे केले आहेत त्या सगळ्या अफवा आहेत. असं काहीही नसतं. काही लोक व्हिडिओ बनवून राजकीय वातावरण तापवतात. परंतु. ते खूप चुकीचं आहे.”
नितेश राणे यांना खुलासा मागितला जाईल : आयोग
प्यारे खान यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर अल्पसंख्याक आयोग काय करणार आहे? यावर प्यारे खान म्हणाले, “कोणीही समाजात तेढ निर्माण करत असेल तर त्यांना जाब विचारला जाईल. नोटीस बजावली जाईल. वारंवार अशी वक्तव्ये का करता? महाराष्ट्राच्या विकासात बाधा येईल अशी वक्तव्ये का करता? या संदर्भात प्रश्न विचारले जातील. आम्ही नितेश राणे यांच्याकडे त्यांनी केलेल्या वक्तव्यांसंदर्भात खुलासा मागू. वारंवार अशी वक्तव्ये करत राहता, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागतो, त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्ये करू नये असं त्यांना सांगितलं जाईल.”
