सांगली : सांगली- पेठ या मार्गास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी शुक्रवारी सांगितले. या रस्त्यावर टोलमाफी मिळावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आ. गाडगीळ यांनी सांगितले, सांगली पेठ हा सांगली-पुणे-मुंबई महामार्गास जोडणाऱ्या मार्गाचे काम अनेक वर्षे रखडलेले होते. या रस्त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्यामुळेच या रस्त्याच्या कामाचा केंद्रीय रस्ते वाहतूक विभागात समावेश करण्यात आला होता आणि त्यानंतर मंत्री गडकरी यांनी यासाठी निधी मंजूर केला होता.
आता या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रस्त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली असून मंत्री गडकरी यांनी या मागणीला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर हा रस्ता टोलमुक्त करण्याच्या मागणीबाबत विचार केला जाईल, असे आश्वासनही दिले असल्याचे त्यांनी सांगितले.