नांदेड : नांदेड ते अर्धापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील अपघातप्रवण ठिकाणांवर सुरक्षेच्या उपाययोजना करून अपघातांचा धोका कमी करण्यासाठी लवकरच आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी हे आश्वासन दिले.
ही भेट बुधवारी दुपारी गडकरी यांच्या संसद भवनातील कार्यालयात झाली. यावेळी खासदार चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर नांदेड ते अर्धापूर दरम्यानच्या अपघातप्रवण ठिकाणांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे जीवितहानी होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. महामार्ग ओलांडण्यासाठी नागरिकांना आणि वाहनचालकांना अनेक ठिकाणी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने, भरधाव अवजड आणि चारचाकी वाहनांमुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत खा. चव्हाण यांनी नांदेड शहरातील दूध डेअरी चौक ते धनेगाव पाटी दरम्यानच्या उड्डाण पुलाच्या रखडलेल्या बांधकामाचा मुद्दा मांडला. धनेगाव येथील नागरिकांचा या उड्डाणपूलाबाबत आक्षेप असल्याचे त्यांनी सांगतले. भराव टाकून उड्डाण पूल झाल्यास नागरिकांना एका बाजूकडून दुसरीकडे जाण्यास अडचणी येतील. त्यामुळे याठिकाणी सिंगर पियर उड्डाण पुलाचा पर्याय स्वीकारावा, जेणेकरून नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग मिळेल, अशी आग्रही मागणी खा. चव्हाण यानी यावेळी केली. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नितीन गडकरी यांनी भराव टाकून उड्डाण पूल बांधण्याऐवजी सिंगल पियर उड्डाण पूल बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती दिली. या पुलाबाबत अहवाल मागवून निर्णय घेण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
पिंपळगाव महादेव येथेही उड्डाण पूल बांधण्याची मागणी खासदार चव्हाण यांनी या बैठकीत केली. या मागणीला देखील मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विस्तृत व्यवहार्यता अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, पिंपळगाव महादेव जंक्शन, देगाव, विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय, खडकूत जंक्शन, दाभड जंक्शन, अर्धापूर बायपास-पांगरी रस्ता जंक्शन आणि शेनी रस्ता जंक्शन यांसारख्या ठिकाणांबाबतही चर्चा झाली. या ठिकाणांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून आवश्यकतेनुसार सर्व्हिस रोड, पादचारी पूल किंवा उड्डाणपूल यांसारख्या पर्यायांचा विचार करण्याची मागणी खासदार चव्हाण यांनी केली.