Nitin Gadkari : राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामजिक वादळ उठले असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचे कर्तृत्त्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. ते शनिवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते.

नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

आज बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती बरोबर सामाजिक प्रगतीही महत्त्वाची आहे. समाजात पैसा आला, शिक्षण आलं. पण समाजाच्या तरुण मुलांवर संस्कार नसेल आणि हातभट्टी आणि दारु हे सुरु झालं ते मी एके काळी पाहिलं होतं. आता ती परिस्थिती नाही. हातमाग बंद झाला आणि हातभट्ट्या सुरु झाल्या होत्या. आता त्यादेखील बंद झाल्या. समाजातल्या वरिष्ठांची जबाबदारी आहे की त्यांनी समाज सुधारणेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आरक्षणाचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे-गडकरी

नितीन गडकरी पुढे म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, मी माझ्या आयुष्यात या ५० वर्षांत सगळ्यात जास्त प्रयत्न नोकऱ्या मिळवून देण्यासाठी केले. एक गोष्टीत आपण यशस्वी झालो की आपण अनेक लोकांच्या नोकऱ्या वाचवू शकलो. आपण त्यामुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष चालू ठेवू. समाजाच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे. समाजात जे वकील आहेत, डॉक्टर आहेत त्यांनी यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. आपल्या पायावर उभं राहा आणि मग काम करा असं मी कायम सांगितलं. पैसा नसल्याशिवाय काही होऊ शकत नाही हे आम्ही अनुभवांमधून शिकलो आहे. कला आणि कौशल्य आपण शिकलो तर आपण चांगली प्रगती करु शकतो.

आमच्यावर परमेश्वराचे उपकार आहेत की आम्हाला आरक्षण नाही-गडकरी

मी कायम गंमतीने सांगतो, मी ब्राह्मण जातीचा. आमच्यावर परमेश्वराने सगळ्यात मोठे उपकार केले असतील तर आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात महत्त्व नाहीये ब्राह्मणांचं, पण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खूप आहे. मी ज्यावेळी तिकडे जातो तिथे लठ्ठीबाज आहे. दुबे, त्रिपाठी वगैरे, जसं आपल्याकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्वं आहे. ते मला सांगतात, मी त्यांना सांगतो मी जातपात मानत नाही. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की कुठलाही माणूस हा धर्म, पंथ, जात आणि सेक्सने मोठा नाही तर तो माणूस त्याच्या गुणांनी मोठा आहे. गुणवत्तेचा विकास आहे त्यात समाजातल्या सुशिक्षितांनी दिशा दिली पाहिजे. कारण बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.