करोना लॉकडाउनमधील निर्बंध शासनाकडून शिथील केले जात असले तरी जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही. असे स्पष्ट करीत याबाबत कडक उपाय योजना राबविण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सोमवारी सातारा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आषाढी एकादशीच्या दिवशी मानाच्या नऊ पालख्या पंढरपूरला पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. वातावरणाचा अंदाज घेऊन हवाई किंवा जमीन मार्गाने पालख्या पोचविण्यात येतील असे देशमुख म्हणाले. तसेच पुढील वारी ही पूर्वी प्रमाणाचे व्हावी याबाबत विठ्ठलाला साकडं घातलं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरण वाढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

लॉकडाउनंतर शिथिलता दिल्यामुळे उद्योग सुरु झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय परत राज्यात येत आहेत. कोरानाचे संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाबत दक्षता घ्यावी. फलटण आणि जावळी तालुक्यात करोनाबाधितांच्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे. तो दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी गृहमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन चाचणीचे प्रमाण वाढवावे यामुळे बाधितांची संख्या कमी होईल. जिल्हा प्रशासन समन्वयाने चांगले काम करीत आहे. मृत्युचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा. बाधितांमध्ये ६१ टक्के पुरुष व ३९ टक्के महिला आहेत. आजपर्यंत एक हजार बारा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात २१ ते ३० वर्ष वयोगटातील तरुणांचे जास्त प्रमाण आहे. जिल्ह्यात ३०८ प्रतिबंधित क्षेत्र आहेत या प्रतिबंधित क्षेत्रात शासनाने दिल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची व गरोदर मातांची काळजी घ्यावी. तसेच गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी टॉसिलीझुमॅब व रेमडेसिवीर हे औषध शासन खरेदी करणार असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ५५ वर्षावरील १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ५० ते ५५ वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना साधेकाम देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवासी संकुलासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.