विधानसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा आहे, असे सांगत भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीची इच्छा नसल्याचे शनिवारी स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या वेगवेगळय़ा भागात शुक्रवारी पंकजा मुंडे यांची संघर्षयात्रा फिरली. शनिवारी िहगोलीला रवाना होण्यापूर्वी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अनुकंपा धर्तीवर आपणास मंत्रिपद नको. गुणवत्ता सिद्ध करूनच मंत्रिपद मिळवेन, असे सांगताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचेच आपले लक्ष्य असल्याचे सांगितले. पक्ष देईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे सांगताना पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली.
मागील १५ वर्षांत घेतले नाहीत तेवढे निर्णय सध्या आघाडी सरकार घेत आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर सरकारचे धाबे दणाणले आहे. त्या पराभूत मानसिकतेतूनच सवंग लोकप्रियतेसाठी राज्य सरकारची धडपड सुरू आहे. लोकांना भुलवण्यासाठीच निर्णय घेतले जाते आहेत. मागील तीन वर्षांपासून राज्याच्या विविध भागांत दुष्काळ पडतो आहे. त्याचा सर्वाधिक फटका मराठवाडय़ाला बसला. आता आलेल्या पावसाचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग नाही. दुबार-तिबार पेरण्या वाया गेल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला. राज्यातील ४० टक्के उद्योग परराज्यात गेले. औद्योगिक विकास खुंटल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला. चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. राज्यातील महिलाही सुरक्षित नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
आघाडी सरकारने राज्यात केलेला भ्रष्टाचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा संघर्षयात्रेचा एल्गार पुकारला आहे. १९९४मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षयात्रा काढली होती. तेव्हा राज्यात सत्तापरिवर्तन झाले. दिवंगत मुंडे यांचे स्वप्न साकारण्यासाठी आपली यात्रा २१ जिल्हे व ८० विधानसभा मतदारसंघांत जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात्रेत भाजपच्या वाटय़ाचे मतदारसंघ असावेत आणि तेथेच सभा व्हाव्यात, असे काही निश्चित नव्हते. दिवंगत मुंडे महायुतीचे शिल्पकार होते. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थही ते सक्रिय होते. राज्यात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे त्या लोकांना भेटणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे हा यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या.
मनसेचे पदाधिकारी व किनवटचे माजी नगरसेवक अशोक नेम्मानीवार, उद्योजक अशोक पाटील सूर्यवंशी यांनी भाजपत प्रवेश केला. यात्रेचे प्रमुख सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, माजी खासदार डी. बी. पाटील, प्रवीण घुगे, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, अॅड. चतन्यबापू देशमुख, प्रवीण साले यांची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No interest in parliamentary election pankaja munde
First published on: 31-08-2014 at 01:50 IST