\

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराची वर्णी लागली नाही. महायुतीच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी देवादिकांना कौल मागितला होता. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

यापूर्वी २००३-०४ च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे दोघे दिग्गज नेते अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात सांगोल्याचे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी कृषी, फलोद्यान व रोहयो खात्याचे मंत्रिपद सांभाळले होते. याशिवाय पंढरपूरचे दिवंगत नेते सुधाकर परिचारक यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद तर माळशिरसचे माजी आमदार हणमंत डोळस यांना राज्य चर्मोद्योग विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले होते. या माध्यमातून एकाचवेळी सोलापूर जिल्ह्याला तब्बल पाच लाल दिव्याच्या मोटारी मिळाल्या होत्या. परंतु आता याच सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. मागील पाच वर्षांपासून सोलापूर जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे.

हेही वाचा >>>Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजी नाट्य? मंत्रिपद न मिळाल्याने ‘या’ आमदारांनी व्यक्त केली खंत

मागील पाच वर्षांत सोलापूर जिल्ह्यात अकरापैकी भाजपसह महायुतीचे तब्बल दहा आमदार असताना त्यापैकी एकालाही मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे अर्थात महायुतीचे पाच आमदार निवडून आले. सलग पाचव्यांदा आमदार झालेले माजी मंत्री विजयकुमार देशमुख, सलग तिसऱ्यांदा आमदारकी मिळालेले माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी या तीन इच्छुकांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती. पाच वर्षांच्या खंडानंतर मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी म्हणून या नेत्यांनी देवादिकांना कौल मागितला होता. अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी त्यांच्या समर्थकांनी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडे घातले होते. तर सोलापूर शहर उत्तरचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांना मंत्रिपदासह सोलापूरचे पालकमंत्रिपद मिळावे म्हणून पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय ऋषी मंदिरात खुद्द देशमुख यांच्या समक्ष साकडे घातले होते. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

हेही वाचा >>>मालवणजवळील आचऱ्यात परंपरागत ‘लॉकडाऊन’!

दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातून विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते डॉ. तानाजी सावंत यांच्या सोलापुरातील समर्थकांनी पंढरपुरात विठ्ठल मंदिरात धाव घेऊन विठ्ठलाला कौल मागितला होता. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील पाच वर्षांपासून सोलापूरला मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक महत्त्वाचे विकास प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे सोलापूरला मंत्रिपदासह स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात होती. परंतु सर्वांची निराशा झाली आहे