पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर आयपीएलसाठी बाहेरुन पाणी घेण्याची गरज नाही असा दावा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केला आहे. कावेरी पाणी तंटय़ामुळे ‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमातील चेन्नई येथे होणारे सहा सामने पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवले जाणार आहेत. या सामन्यांदरम्यान मैदान आणि खेळपट्टीच्या देखभालीसाठी पुणे पालिकेकडे अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी करणार का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे केली होती. यावर भूमिका स्पष्ट करताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयपीएलसाठी बाहेरुन पाणी घेण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील गहुंजे स्टेडियमकडे रेनवॉटर हार्वेस्टिंगचा 32 दिवस पुरेल इतका स्वत:चा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आयपीएलसाठी बाहेरुन पाणी घेण्याची गरज नाही असं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सांगितलं आहे.

राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती तसेच पाणी टंचाईची समस्या असताना ‘आयपीएल’च्या सामन्यांदरम्यान खेळपट्टय़ा चांगल्या राहाव्यात यासाठी कोटय़वधी लीटर पाण्याची उधळपट्टी केली जात असल्याची बाब २०१६ मध्ये ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या संस्थेने याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत न्यायालयानेही मुंबई आणि राज्यातील आयपीएलचे सामने अन्यत्र खेळवण्याचे आदेश दिले होते. मात्र अशी परिस्थिती प्रत्येक उन्हाळ्यात असते. त्यामुळे याचिका निकाली न काढता प्रलंबित ठेवण्यात आली होती.

पुणे शहर आणि ग्रामीण आधीच पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात असल्याची बाबही याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याची दखल घेत पुण्यातील मैदानाच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या सामन्यांसाठी पुणे पालिकेकडे अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी करणार का, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. तसेच असोसिएशनला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, अशीच विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी वानखेडे स्टेडिअमच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) केली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या मुंबई महानगरपालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करत मैदानासाठी विशेष पाणीपुरवठा करणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No need to take water from outside claims mca
First published on: 18-04-2018 at 13:15 IST