विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक आणि शासकीय कर्मचारी यांनाच प्रवेश असेल असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला. गुरुवारी विधिमंडळात मेन पोर्च इथे दोन सदस्यांच्या अभ्यागतांदरम्यान झालेल्या मारहाणीच्या संदर्भात अध्यक्ष बोलत होते. या घटनेची चौकशी विधिमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात झाली असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे असंही अध्यक्षांनी स्पष्ट केलं.

‘विधानमंडळाच्या उच्च परंपरांचं पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे. आपले उत्तरदायित्व संविधानाशी आहे. विधानमंडळासह सर्व संस्था संविधानातून निर्माण झाल्या आहेत. विधानमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेताना कायद्याद्वारे स्थापित झालेल्या संविधानाबद्दल श्रद्धा, निष्ठा बाळगण्याची शपथ घेतो. कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची शपथ घेतो. त्याचे आपण सर्वांनी गांभीयपूर्वक पालन करावे. त्यादृष्टीने मी जाहीर करत आहे की विधिमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्माननीय सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहायक आणि शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश असेल. इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही’, असे अध्यक्षांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, ‘मंत्रिमहोदयांकडून वेगवेगळ्या बैठका विधानभवन इथे घेण्यात येतात. त्यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्याची विनंती करण्यात येते. मंत्रिमहोदयांनी ब्रीफिंग आणि बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. अत्यंत अपवादा‍त्मक परिस्थितीत माननीय अध्यक्ष आणि सभापती यांच्यासमवेत असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्रिमहोदयांना विधिमंडळात बैठक घेण्याची आणि अभ्यागतांना प्रवेशाची परवानगी देण्यात येणार नाही’.