राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार यांचे नाव चर्चेत असले तरी खुद्द पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मला राजकारणातून लवकर निवृत्त व्हायचे नसून मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही असे पवारांनी म्हटले आहे.
जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणुक होणार असून यात शरद पवार यांचे नावही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. पवार म्हणाले, राष्ट्रपती झाल्यावर अलिशान घर मिळते, हे सर्व ठीक आहे. पण प्रसारमाध्यमांती मंडळीशी भेटता येत नाही. मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसून मला राजकारणातून एवढ्या लवकर निवृत्त व्हायचे नाही असेही त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत शरद पवारांनी समृद्धी महामार्ग प्रकल्पावरही भाष्य केले. समृद्धी महामार्ग प्रकल्पाला विविध जिल्ह्यातून विरोध होत असल्याने पवारांनी यासंदर्भात लोकप्रतिनिधींची भेट घेऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. अनेक तरतुदींची पूर्तता झाली नाही अशी तक्रार अनेकांनी केली असली तरीदेखील सरकारतर्फे भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असल्याचे पवार म्हणालेत. नाशिक जिल्ह्यातील १,८५० हेक्टर जमीन आदिवासी भागातून घेतलेली असून यामुळे कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसते असा आरोपही त्यांनी केला.
मोजणी झाल्यानंतर जमीन दिल्याच्या संमती कागदपत्रावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी नसल्याचा दावाही त्यांनी केला. १२ जूनला औरंगाबादमध्ये प्रकल्पबाधित आणि संघर्ष समितीच्या लोकांना एकत्र घेऊन चर्चा करु आणि त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे पवार यांनी नमूद केले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक झाली होती. पवार यांनी यापूर्वीही आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरण्यासाठी शरद पवार यांची मनधरणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती.